फोन तोडला, पुरावे नष्ट केले...सिसोदियांच्या रिमांडवर ED नं कोर्टाला काय-काय सांगितलं पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 08:32 PM2023-03-17T20:32:20+5:302023-03-17T20:33:55+5:30
दिल्लीतील कथित अबकारी कर घोटाळ्याप्रकरणातील आरोपी असलेल्या आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत कोर्टानं पाच दिवसांची वाढ केली आहे.
दिल्लीतील कथित अबकारी कर घोटाळ्याप्रकरणातील आरोपी असलेल्या आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत कोर्टानं पाच दिवसांची वाढ केली आहे. सिसोदियांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करणारं विनंती पत्र ईडीनं कोर्टात दिलं होतं. यावर निर्णय देताना कोर्टानं ईडीची विनंती मान्य करत कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे.
मनीष सिसोदियांचा बंगला आतिशीला दिला, 'त्यांची आई, बायको आणि मुलं कुठे जाणार?' भाजपचा सवाल
सिसोदिया यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करताना ईडीनं याप्रकरणाशी निगडीत काही तथ्य कोर्टासमोर मांडले. दिल्ली सरकारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी कथित अबकारी घोटाळ्याबाबत मोठ्या प्रमाणावर पुरावे नष्ट करण्यासोबतच पुरावे लपवले असल्याचा दावा ईडीनं केला आहे. फोन नष्ट करणे यामागे गुन्हा लपवण्याचा हेतू स्पष्टपणे दिसून येतो. मोठ्या प्रमाणावर डिजिटल पुरावे नष्ट करण्यासाठी, गुन्ह्यातून मिळालेली रक्कम, मनी ट्रेल तसेच गुन्ह्याच्या कमाईशी संबंधित प्रक्रियेत सहभागाचे पुरावे जाणूनबुजून नष्ट केले गेले. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यात आले आहेत, असं ईडीनं कोर्टात म्हटलं आहे.
ज्या दिवशी CBI मध्ये तक्रार त्याच दिवशी सिसोदियांनी फोन बदलला
एलजीने सीबीआयकडे तक्रार पाठवली त्याच दिवशी मनीष सिसोदिया यांनी फोन नष्ट केला, जो ते बराच काळ वापरत होता. ईडीने माहिती दिली की, चौकशी दरम्यान मनीष सिसोदिया यांनी खुलासा केला आहे की ते बराच काळ (किमान गेल्या 8 महिन्यांपासून) ते एकाच मोबाईल फोनचा वापर करत होते. जो २२ जुलै २०२२ रोजी बदलला होता. ईडीने सांगितले की हे सर्व ज्या तारखेला दारू घोटाळ्याची तक्रार एलजीने सीबीआयकडे पाठवली त्याच तारखेला करण्यात आले आहे.
ईडीने म्हटले आहे की, "दुसऱ्या व्यक्तीचे सिम कार्ड आणि हँडसेट वापरल्याने पुरावे नष्ट करण्याची सुनियोजित योजना उघड होते. दुसर्या व्यक्तीच्या नावाने नोंदणीकृत सिम कार्ड आणि हँडसेट वापरण्याचा उद्देश सिमशी संबंधित व्हॉट्सअॅप/डेटा आणि फोनमध्ये साठवलेला डेटा त्याच्या मालकीचा आहे हे नाकारणे हा आहे. हे पुरावे नष्ट करण्याची आणि मोबाईल नष्ट करण्याची सुनियोजित योजना दर्शवते”
ओबेरॉय हॉटेलच्या बिझनेस सेंटरमध्ये डिल
(ईडी) ने सांगितले की, साउथ ग्रूपचे सदस्य/प्रतिनिधी १४ मार्च ते १७ मार्च २०२१ या कालावधीत ओबेरॉय हॉटेल, नवी दिल्ली येथे थांबले होते, असेही तपासात समोर आले आहे. ओबेरॉय हॉटेलच्या बिझनेस सेंटरचा वापर साऊथ ग्रुपच्या प्रतिनिधींनी केला होता. या कालावधीत मसुदा GoM अहवालात (5% ते 12%) बदल झाले.