चर्चा निष्फळ ठरल्यास शेतकऱ्यांचा पुढचा प्लान काय? जाणून घ्या...
By मोरेश्वर येरम | Published: December 6, 2020 10:53 AM2020-12-06T10:53:09+5:302020-12-06T11:06:02+5:30
९ डिसेंबर रोजी सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची पुन्हा एकदा बैठक होणार आहे.
नवी दिल्ली
नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. २६ नोव्हेंबर रोजी सुरू झालेलं शेतकऱ्यांचं आंदोलन आज ११ व्या दिवशी देखील सुरुच आहे. केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला 'भारत बंद'ची हाक दिली आहे. यानंतर ९ डिसेंबर रोजी सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची पुन्हा एकदा बैठक होणार आहे.
आंदोलक शेतकरी ९ डिसेंबर नंतरच्या रणनितीवर देखील काम करत आहेत. जर सरकारने ९ डिसेंबर रोजी देखील आडमुठी भूमिका कायम ठेवली तर दिल्लीच्या सर्व सीमा सील करण्याची रणनिती शेतकऱ्यांनी आखली आहे. शेतकऱ्यांचे याआधीच सिंघू सीमा, टिकरी सीमा आणि गाजीपूर सीमेवर ठिय्या आंदोलन सुरू आहे. सर्व शेतकरी आंदोलन ठिकाणी राहण्याच्या उद्देशाने लागणारं सर्व सामान सोबत घेऊन आले आहेत. याशिवाय स्थानिक संस्था देखील शेतकऱ्यांना मदत करत आहेत.
१० डिसेंबरपासून आंदोलन आणखी तीव्र
केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये ९ डिसेंबर रोजी होणारी चर्चा निष्फळ ठरली. तर १० डिसेंबरपासून दिल्लीसाठी मोठं संकट निर्माण होऊ शकतं. दिल्लीच्या सर्व सीमांवर घेराव घालण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. सिंघू सीमेसह यापुढील काळात लोनी सीमा, गाजीपूर आणि दिल्ली-नोएडा सीमा देखील बंद करण्याचा शेतकऱ्यांचा इरादा आहे. असं झाल्यास दिल्लीत हाहाकार उडू शकतो.
दिल्लीच्या जवळपास १.५ कोटी जनतेला दररोज दूध, भाजी, फळं आणि इतर वस्तूंची वाहतूक उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधून होते. शेतकऱ्यांनी जर दिल्लीच्या सर्व सीमा बंद केल्या तर दिल्लीकरांसाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते.