दिल्ली आग: न्यायालयीन चौकशीचे दिले आदेश; राज्य व केंद्र सरकारची मदतीची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 06:15 AM2022-05-15T06:15:35+5:302022-05-15T06:16:36+5:30
मुंडका मेट्रो स्टेशनजवळील इमारतीला लागलेल्या आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, या दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मुंडका मेट्रो स्टेशनजवळील चार मजली इमारतीला शुक्रवारी लागलेल्या आगीच्या दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. या दुर्घटनेत २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य व केंद्र सरकारने मदतीची घोषणा केली आहे. या प्रकरणी इमारतीच्या दोन मालकांना अटक केली आहे.
शुक्रवारी सांयकाळी अचानकपणे या चार मजली इमारतीला आग लागली. या आगीने लवकरच एवढे रौद्र रूप धारण केले की, आकाशात केवळ ज्वाळा व धूर दिसत होता. आतापर्यंत या दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक देहाचा संपूर्ण कोळसा झाला आहे. त्यामुळे नातेवाइकांनाही मृतदेहाची ओळख पटविणे कठीण झाले आहे. काहीजणांना दवाखान्यात भरती केले आहे. मृत व जखमींच्या नातेवाइकांनी आता दवाखान्यात ओळख पटविण्यासाठी गर्दी केली आहे.
मुख्यमंत्र्यांची घटनास्थळाला भेट
- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी घटनास्थळाला भेट दिली. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी १ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केली.
- जखमींना ५० रुपयांची मदत मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
- या प्रकरणी या इमारतीचे मालक हरीश गोयल व वरुण गोयल या दोन भावांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही भावांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.