'जगाला चांगला संदेश जाणार नाही', यमुनेची पातळी वाढली; केजरीवालांचे अमित शहांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 04:43 PM2023-07-12T16:43:57+5:302023-07-12T16:45:14+5:30

राजधानी दिल्लीत 45 वर्षात पहिल्यांदाच यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे.

Delhi Flood, CM arvind Kejeiwals letter to Union Home Minister Amit Shah over Yamuna flood levels | 'जगाला चांगला संदेश जाणार नाही', यमुनेची पातळी वाढली; केजरीवालांचे अमित शहांना पत्र

'जगाला चांगला संदेश जाणार नाही', यमुनेची पातळी वाढली; केजरीवालांचे अमित शहांना पत्र

googlenewsNext

Delhi Flood: राजधानी दिल्लीत गेल्या 45 वर्षात पहिल्यांदाच यमुना नदीने विक्रमी जलपातळी गाठली आहे. यामुळे दिल्लीतील सखल भाग पुराच्या पाण्यात बुडाला आहे. रहिवासी भागातही पाणी तुंबल्यामुळे अनेक ठिकाणी घरे-दुकाने पाण्याखाली गेली आहेत. नदीची पातळी सातत्याने वाढत असल्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. या पत्रात त्यांनी G-20 परिषदेचाही हवाला दिला आहे.

सीएम केजरीवाल यांनी आपल्या पत्रात लिहिले की, आज (बुधवार) दुपारी 1 वाजता दिल्लीतील यमुनेची पातळी 207.55 मीटरवर पोहोचली आहे. ही धोक्याच्या चिन्हाच्या (205.33 मीटर) वर आहे. याआधी 1978 मध्ये यमुनेची कमाल पातळी 207.49 मीटर पोहोचली होती. त्यावेळी दिल्लीत पूर आला होता आणि परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. आता पाण्याची पातळी 207.55 मीटरवर पोहचल्यामुळे दिल्लीत पूराचा धोका वाढला आहे. 

जलपातळी 207.72 मीटरपर्यंत पोहोचेल
ते पुढे म्हणाले की, केंद्रीय जल आयोगाच्या नुकत्याच आलेल्या अंदाजानुसार यमुनेची पातळी आज रात्री 207.72 मीटरपर्यंत पोहोचेल, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडलेला नाही. दिल्लीतील पावसामुळे यमुनेच्या पाण्याची पातळी वाढत नसून, हरियाणातील हथिनीकुंडमधून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे पाणीपातळी वाढत आहे. तुम्हाला विनंती करतो की, शक्य असल्यास हथिनीकुंडचे पाणी मर्यादित वेगाने सोडावे, जेणेकरून दिल्लीतील यमुनेची पातळी आणखी वाढू नये.

'जगाला चांगला संदेश जाणार नाही'
जी-20 शिखर परिषदेचा दाखला देत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की, दिल्ली ही देशाची राजधानी आहे आणि काही आठवड्यात येथे G20 शिखर परिषद होणार आहे. देशाच्या राजधानीत आलेल्या पुराच्या बातम्यांनी जगाला चांगला संदेश जाणार नाही. आपण सर्वांनी मिळून दिल्लीच्या जनतेला या परिस्थितीतून वाचवायचे आहे, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले.

दिल्लीतील या भागात पाणी तुंबले
काश्मीर गेटच्या मोनस्ती मार्केट, रिंगरोड, यमुना घाट, यमुना बाजार परिसरात पुराचे पाणी पोहोचले आहे. आयटीओ येथील छठ घाट पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे. यमुना नदीलगतचा परिसर अतिशय संवेदनशील आहे. या भागात सुमारे 41 हजार लोक राहतात. दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील 6 जिल्ह्यांमध्ये बाधित लोकांसाठी सुमारे 2700 तंबू बनवण्यात आले आहेत. या तंबूंमध्ये राहण्यासाठी आतापर्यंत 27 हजार लोकांनी नोंदणी केली आहे. 
 

Web Title: Delhi Flood, CM arvind Kejeiwals letter to Union Home Minister Amit Shah over Yamuna flood levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.