डॉक्टरांचा चमत्कार; अपंग रुग्णाला बसवले मृत महिलेचे हात, आता दोन्ही हाताने करू शकतो काम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 05:15 PM2024-01-25T17:15:41+5:302024-01-25T17:17:50+5:30
रेल्वे अपघातात हात गमावलेल्या व्यक्तीला मृत महिलेचे हात बसवण्यात आले.
नवी दिल्ली: देवाची कृपा असेल तर मुके बोलू लागतात अन् लंगडे चालू लागतात. आतापर्यंत तुम्ही हे फक्त ऐकत असेल, पण आता आता प्रत्यक्षात असे घडले आहे. दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलच्या प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जरी विभागाचे एचओडी डॉ. महेश मंगल यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या पथकाने एक मोठा चमत्कार केला.
ब्रेन डेड महिलेचे हात बसवले
दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांनी तीन वर्षांपूर्वी रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या व्यक्तीचे दोन्ही हात पुन्हा जिवंत केले. या 45 वर्षीय व्यक्तीला 65 वर्षीय ब्रेन डेड महिलेचे हात बसवण्यात आले. तब्बल 12 तासांच्या अथक परिश्रमानंतर मृत महिलेचा हात कापून तरुणाला जोडण्यात 7 डॉक्टरांच्या पथकाला यश आले. ती व्यक्ती आता स्वतःच्या हाताने अन्न खाऊ शकते आणि सामान्य माणसाप्रमाणे इतर कामेही करू शकते.
अवयव दानाने अनेकांना जीवदान
दिल्लीतील सेवानिवृत्त उपप्राचार्य कालका जी यांना ब्रेन हॅमरेज झाला. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी यकृत, किडनी, हात आणि डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांची एक किडनी गुरुग्रामच्या फोर्टिस रुग्णालयातील एका रुग्णाला बसवण्यात आली. याशिवाय महिलेचे दोन्ही हात, यकृत आणि कॉर्नियाचे सर गंगाराम रुग्णालयात वेगवेगळ्या रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले आहे. दोन्ही हातांचे प्रत्यारोपण हे उत्तर भारतातील अशा प्रकारचे पहिले प्रत्यारोपण आहे. यापूर्वी मुंबईत या प्रकारचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे.
रुग्णाकडून एकही रुपया घेतला नाही
या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांची संपूर्ण टीम तैनात करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमचे नेतृत्व डॉ.महेश मंगल करत होते. डॉ. महेश मंगल हे देशातील प्रसिद्ध प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन असून, सध्या ते गंगाराम हॉस्पिटलच्या प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जरी विभागाचे अध्यक्ष कम एचओडी आहेत. विशेष म्हणजे, भारतात हात प्रत्यारोपणासाठी साधारणपणे 25 ते 30 लाख रुपये खर्च येतो. पण, प्रत्यारोपणासाठी रुग्णालयाने त्या रुग्णाकडून कोणतेही शुल्क घेतलेले नाही.