श्रीवास्तव दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 02:45 AM2020-02-29T02:45:09+5:302020-02-29T02:45:39+5:30
श्रीवास्तव १ मार्चपासून आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतील
नवी दिल्ली : दिल्ली पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार वरिष्ठ आयपीएस अधिकारी एस. एन. श्रीवास्तव यांच्यावर सोपवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईक यांचा कार्यकाळ ३१ जानेवारीला संपला होता. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना एक महिन्याची मुदतवाढ दिली होती. पटनाईक यांचा कार्यकाळ शनिवारी संपत आहे. श्रीवास्तव १ मार्चपासून आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतील.
सर्वतोपरी प्रयत्न
ईशान्य दिल्लीतील हिंसाचारामुळे श्रीवास्तव यांची काही दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांच्या विशेष आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती. श्रीवास्तव याआधी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे विशेष महानिदेशक होते. ते १९८५ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत.
दिल्लीकरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यालाच प्राधान्य देणार असल्याचे एस.एन. श्रीवास्तव यांनी सांगितले. लोकांना दिल्ली सुरक्षित वाटायला हवी. त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.