दिल्ली सरकारने केल्या विद्यापीठांच्या परीक्षा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 02:41 AM2020-07-12T02:41:30+5:302020-07-12T02:41:54+5:30
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा करताना सांगितले की, सध्याच्या स्थितीत परीक्षा घेणे शक्य नाही; पण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी पदव्या देणेही गरजेचे आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन दिल्ली सरकारने त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या दिल्लीत सर्व विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला.
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा करताना सांगितले की, सध्याच्या स्थितीत परीक्षा घेणे शक्य नाही; पण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी पदव्या देणेही गरजेचे आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
विद्यार्थ्यांना अभ्यासातील त्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीच्या आधारे पुढील वर्षात किंवा पुढील सेमीस्टरला प्रवेश द्यावा किंवा पदवी प्रदान करावी, असे विद्यापाठांना सांगण्यात आले आहे. इयत्ता १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा न घेता पुढील वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता.
तरुणांचे भविष्य वाचवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: हस्तक्षेप करून दिल्ली विद्यापीठासह दिल्लीतील अन्य केंद्रीय विद्यापीठांच्या परीक्षाही रद्द करून तरुणांचे भविष्य वाचवावे, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टिष्ट्वटरवरून केले. तशाच आशयाचे मोदींना शनिवारी पाठविलेले पत्रही त्यांनी त्यासोबत जोडले.