भाजप दिल्लीत दोन उपमुख्यमंत्री बनवू शकते, सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 12:16 IST2025-02-13T12:15:17+5:302025-02-13T12:16:00+5:30
Delhi Govt Formation : पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीत सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.

भाजप दिल्लीत दोन उपमुख्यमंत्री बनवू शकते, सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू
Delhi Govt Formation : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. या विजयानंतर आता भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच राजधानी दिल्लीला 'मिनी भारत' अशी ओळख देण्यासाठी नवीन मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांचा समावेश करण्याच्या पर्यायावर भाजप विचार करत आहे.
यासंदर्भात भाजप नेत्यांनी बुधवारी माहिती दिली. दिल्ली सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असण्याच्या हालचालीमुळे पक्षाला वेगवेगळ्या जाती, समुदाय आणि प्रादेशिक पार्श्वभूमी असलेल्या आमदारांना सामावून घेण्यास मदत होईल, असे पक्षाच्या काही नेत्यांनी म्हटले आहे. भाजप नेत्यांनी पीटीआयला संवाद साधला.
यावेळी, दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करणे खूप शक्य आहे, कारण इतर अनेक राज्यांमध्ये असे करण्यात आले आहे. तिथे विविध पार्श्वभूमीतील नेत्यांना सामावून घेण्यासाठी दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपशासित मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये असे करण्यात आले आहे, असे भाजप नेत्यांनी सांगितले.
पुढे भाजप नेत्यांनी सांगितले की, हा प्रस्ताव राष्ट्रीय नेतृत्वाच्या विचाराधीन आहे, जो त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. याशिवाय मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या नावांवरही अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. तसेच, विधिमंडळ गट नेत्याची निवड करण्यासाठी भाजप विधिमंडळ पक्षाची रविवारी बैठक होण्याची शक्यता आहे, असे भाजप नेत्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीत सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्ये भाजपच्या अनेक आमदारांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये नवी दिल्ली मतदारसंघातून आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा यांचे नाव सर्वाधिक जास्त चर्चेत आहे.
याचबरोबर, दिल्ली भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष विजेंदर गुप्ता, सतीश उपाध्याय, मनजिंदर सिंग सिरसा, पवन शर्मा, आशिष सूद, रेखा गुप्ता आणि शिखा राय यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. या विजयामुळे २७ वर्षानंतर भाजपचे दिल्लीत कमबॅक झाले आहे.