दिल्ली: हनुमान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान हिंसाचार; अनेक वाहनांची तोडफोड, पोलीसही जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 09:14 PM2022-04-16T21:14:54+5:302022-04-16T21:15:12+5:30
हनुमान जयंतीच्या दिनी निघालेल्या मिरवणुकीदरम्यान काही समाजकंटकांनी गाड्यांची तोडफोड केली. यात काही पोलीस कर्मचारी जखमीही झाले.
हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दिल्लीच्या जहांगीर पुरीमध्ये हिंसाचार झाल्याची घटना घडली. काही समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड केली असून यात पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हनुमान जयंतीनिमित्त मिरवणूक काढली जात असताना हा हिंसाचार सुरू झाला आणि बघता बघता काही समाजकंटकांनी अनेक वाहनांची तोडफोड केली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही हल्ला करण्यात आला.
या घटनेनंतर याचा व्हिडीओदेखील समोर आला. पोलिसांनी जेव्हा परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही समाजकंटकांनी त्यांच्यावरही हल्ला केला. तसंच मिरवणुकीवरही दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना जहांगीरपुरीतील बाबू जगजीवनराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. मिरवणुकीदरम्यान ही घटना घडल्याची माहिती दिल्ली पोलिस पीआरओचे काम पाहणारे डीसीपी अनवेयस राय यांनी सांगितलं.
सध्या या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असून अतिरिक्त पोलीस दलही तैनात करण्यात आलं आहे. काही ठिकाणी आगीच्याही घटना घडल्या असून आग ही मोठ्या प्रमाणात नव्हतं त्यामुळे ऑपरेशन कॉल ऑफ करण्यात आलं आणि गाड्याही माघारी बोलावण्यात आल्याचं दिल्ली फायर सर्व्हिसेसचे डायरेक्टर अतुल गर्ग यांनी सांगितलं.
दिल्ली के जहांगीर पुरी में शोभायात्रा में पथराव की घटना बेहद निंदनीय है। जो भी दोषी हों उन पर सख़्त कार्रवाई होनी चाहिए। सभी लोगों से अपील- एक दूसरे का हाथ पकड़कर शांति बनाए रखें।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 16, 2022
शांतता राखण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन
यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली. "सर्वांनी शांतता राखावी. दिल्लीच्या जहांगीरपुरीतील मिरवणुकीवरील दगडफेकीची घटने नींदनीय आहे. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. लोकांनी एकमेकांसोबत राहून शांतता कायम ठेवली पाहिजे," असं केजरीवाल म्हणाले.