परदेशात जायचंय? 18 हजार कोटी जमा करा, कोर्टाचे गोयल यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 05:19 PM2019-07-09T17:19:00+5:302019-07-09T17:19:15+5:30
दिल्ली उच्च न्यायालयानं जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना परदेशात जाण्याची परवानगी अप्रत्यक्षरीत्या फेटाळली आहे.
नवी दिल्लीः दिल्ली उच्च न्यायालयानं जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना परदेशात जाण्याची परवानगी अप्रत्यक्षरीत्या फेटाळली आहे. तसेच त्यांच्याविरोधातल्या ‘लूक आउट सर्क्युलर’ (एलओसी)ला आव्हान देणाऱ्या याचिकेवरून केंद्र सरकारकडून न्यायालयानं उत्तरही मागितलं आहे. न्यायाधीश सुरेश कैत म्हणाले, यावेळी गोयल यांना कोणताही अंतरिम दिलासा देता येणार नाही. जर त्यांना तात्काळ परदेश दौरा करायचा असेल तर त्यांना हमीच्या आधारे 18 हजार कोटी रुपये जमा करावे लागतील.
गोयल यांनी लूक आऊट सर्क्युलरला आव्हान देणाऱ्या याचिकेत म्हटलं आहे की, माझ्याविरोधात प्राथमिक स्वरूपात कोणताही गुन्हा दाखल नाही. तरीही 25 मे रोजी मला दुबईला जाणाऱ्या विमानातून उतरण्यात आले. जेव्हा मी 25 मे रोजी पत्नीबरोबर दुबईला जात होतो, तेव्हा म्हणजेच 25 मे रोजी लूक आऊट सर्क्युलरबद्दल समजलं. गोयल पत्नीसह पहिल्यांदा दुबईला जाणार होते आणि तिकडून ते लंडनसाठी रवाना होणार होते. न्यायालयानं गोयल यांना परदेशात जाण्याचं कारणही विचारलं आहे. तुम्ही गुंतवणूकदारांशी फोनवरून बोलू शकत नाही काय?, परदेशात जाण्याचा अधिकार हा मर्यादित आहे. तुम्हीही काहीही कराल आणि मग परदेशात जाल, तर असं होत नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. अनेक प्रकरणात अडकलेली अशी बरीच माणसं परदेशात गेली आहेत आणि त्यांना परत भारतात बोलवण्यासाठी सरकारला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत. गोयल यांनी परदेशात जाण्याचा हेतू न्यायालयाकडे स्पष्ट केलेला नाही.
Delhi HC issues notice to centre over former Jet Airways chairman Naresh Goyal's (file pic) plea seeking quashing of Look out Circular issued against him. Court has refused to stay the Look out Circular. Court has asked respondents to file reply by next date of hearing 19 August. pic.twitter.com/BKWldcqKm6
— ANI (@ANI) July 9, 2019
गेल्या काही काळापासून आर्थिक संकटात सापडलेली विमान वाहतूक कंपनी जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नरेश गोयल यांच्यासोबत त्यांची पत्नी अनिता गोयल यांनीही जेट एअरवेजमधील आपले पद सोडले होते. नरेश गोयल हे जेट एअरवेजच्या मुख्य प्रवर्तकांपैकीएक होते. दरम्यान, कंपनीची आर्थिक बाजू कोलमडू लागल्यानंतर स्वत:हून नरेश गोयल यांनी स्वत:हून पुढाकार घेत राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यादरम्यान त्यांनी जेटच्या कर्मचाऱ्यांना एक भावूक पत्र लिहून आपण कुठलेही बलिदान देण्यास तयार आहोत, असे म्हटले होते.