मोठी बातमी! बाबा रामदेव यांच्या अडचणी वाढल्या; आता 'कोरोनिल'वरुन कोर्टानं बजावले समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 01:33 PM2021-06-03T13:33:34+5:302021-06-03T13:34:44+5:30
Baba Ramdev : अॅलोपथी उपचारांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण ताजं असतानाच आता योगगुरू बाबा रामदेव यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
Baba Ramdev : अॅलोपथी उपचारांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण ताजं असतानाच आता योगगुरू बाबा रामदेव यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दिल्ली हायकोर्टानं 'पतांजलि'च्या 'कोरोनिल' औषधाबाबत समाजमाध्यमांमध्ये चुकीची माहिती दिल्याप्रकरणी समन्स धाडले आहेत. त्यामुळे बाबा रामदेव यांच्यासमोर आता नवा पेच निर्माण झाला आहे.
दिल्ली मेडिकल असोसिएशननं 'पतांजलि'कडून 'कोरोनिल' संदर्भात चुकीची माहिती देण्यापासून रोखण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीदरम्यान बाबा रामदेव यांच्या वकिलांना कोर्टानं याप्रकरणात पुढील सुनावणीपर्यंत 'पतांजलि'नं 'कोरोनिल' संदर्भात सार्वजनिक पातळीवर कोणतंही भाष्य करू नये, असं सांगितलं आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १३ जुलै रोजी होणार आहे.
बाबा रामदेव यांनी याआधी अॅलोपॅथी उपचारांना मूर्ख विज्ञान ठरवून मोठा वाद निर्माण केला होता. रामदेव यांच्या विधानानंतर देशातील डॉक्टरांनी याचा जोरदार निषेध व्यक्त केला आहे. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशननं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहून बाब रामदेव यांनी केलेल्या विधानावरुन नाराजी व्यक्त केली होती. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही बाबा रामदेव यांना पत्र लिहून डॉक्टरांप्रती केलेलं विधान अजिबात स्विकारार्ह नसून ते मागे घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर बाबा रामदेव यांनी आपलं विधान मागे घेतलं होतं.