Satyendar Jain : मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ९ जूनपर्यंत ईडी कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 05:18 PM2022-05-31T17:18:35+5:302022-05-31T17:19:28+5:30
Satyendar Jain : सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीकडून सोमवारी अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांना कोर्टाने ९ जूनपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी सत्येंद्र जैन यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर सत्येंद्र जैन यांना आज राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले.
ईडीच्या बाजूने कोर्टात हजर झालेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, आमच्याकडे डेटा एन्ट्री आहे की हवालामध्ये पैसे कसे गुंतवले, पैसे पाठवले गेले. ईडीने १४ दिवसांची कोठडी मागितली होती. याआधी, ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही तासांच्या चौकशीनंतर सत्येंद्र जैन यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत अटक करण्यात आली. तसेच, संत्येंद्र जैन कोर्टात उत्तर देण्यास टाळाटाळ करण्यात असल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे.
Delhi minister Satyendar Jain sent to Enforcement Directorate custody till 9th June in an alleged money laundering case
— ANI (@ANI) May 31, 2022
(file pic) pic.twitter.com/zlC3rtARmN
दरम्यान, सत्येंद्र जैन हे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमध्ये आरोग्य, उद्योग, ऊर्जा, गृह, शहरी विकास आणि पाणी मंत्री आहेत. सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीकडून सोमवारी अटक करण्यात आली आहे. हवाला केस प्रकरणी सत्येंद्र जैन यांची ईडीकडून याआधीपासूनच चौकशी सुरू होती. ईडीने ५ एप्रिल रोजी कारवाई करत त्यांची ४.८१ कोटी रुपयांची संपत्ती देखील जप्त केली होती. आता थेट अटकेची कारवाई झाल्याने केजरीवाल सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
सत्येंद्र जैन यांनी 2015-16 मध्ये तीन खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून पैसा मिळविल्याचा आरोप आहे. प्रायाज इन्फो सॉल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, अकिनन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मनगलियातन प्रोजक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या शेअरमधून कथितरित्या कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता मिळविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच, सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबीयांचे सुद्धा या कंपनांमधून शेअर आहेत.
मी स्वत: प्रकरणाचा अभ्यास केला, हे पूर्णपणे फेक आहे - अरविंद केजरीवाल
सत्येंद्र जैन यांना ईडीने अटक केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सत्येंद्र जैन यांच्याविरोधातील प्रकरण पूर्णपणे फेक असून राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर अरविंद केजरीवाल म्हणाले, "तुम्ही पंजाबमध्ये एका राज्यमंत्र्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकले होते ज्याची कोणत्याही तपास संस्थेला किंवा विरोधी पक्षाला कल्पना नव्हती. आम्ही हवं असतं तर ते दडपून टाकू शकलो असतो, पण आम्ही स्वतःहून त्याच्यावर कारवाई सुरू केली आणि त्याला अटक केली. मी स्वत: सत्येंद्र जैन यांच्यावरील खटल्याचा अभ्यास केला आहे. ते प्रकरण पूर्णपणे फेक आहे आणि त्यांना राजकीय कारणांसाठी हेतुपुरस्सर गोवण्यात आले आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. जैन हे सत्याच्या मार्गावर आहेत आणि ते स्वच्छ बाहेर येतील."