फूटपाथवर राहणाऱ्यांना उष्णतेच्या लाटेचा फटका; ९ दिवसांत उष्माघाताने १९२ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 07:57 AM2024-06-20T07:57:54+5:302024-06-20T07:59:07+5:30
उष्माघातामुळे लोकांचा आजारी पडून मृत्यू होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. जे लोक बेघर आहेत किंवा फूटपाथवर रात्र घालवतात त्यांच्यासाठी हे अधिक कठीण आहे.
देशभरात कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक त्रस्त आहेत. दिल्लीची अवस्थाही वाईट आहे. येथील तापमान ४७ अंशांवर पोहोचले आहे. उष्माघातामुळे लोकांचा आजारी पडून मृत्यू होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. जे लोक बेघर आहेत किंवा फूटपाथवर रात्र घालवतात त्यांच्यासाठी हे अधिक कठीण आहे. एका रिपोर्टनुसार, ११ ते १९ जून २०२४ दरम्यान दिल्लीत उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे १९२ बेघर लोकांचा मृत्यू झाला आहे.
उष्माघातामुळे बेघर लोकांच्या समस्या वाढत आहेत. त्यांना मूलभूत सुविधांचा लाभ मिळत नाही. उदाहरणार्थ, आरोग्य सुविधा, उष्णता टाळण्यासाठी पंखे. यामुळे बेघर लोकांना उष्णतेशी संबंधित आरोग्य समस्या जसं की थकवा, उष्माघात आणि डिहायड्रेशनचा सामना करावा लागतो. त्यांना आश्रय देण्यासाठी बांधलेले शेल्टर अनेकदा क्षमता आणि सुविधांच्या बाबतीत कमी पडतात. त्यामुळे हवामानातील बदलांचा त्यांच्यावर सर्वाधिक परिणाम होतो.
सेंटर फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट (CHD) नावाच्या एनजीओचे कार्यकारी संचालक सुनील कुमार अलेदिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दिल्लीमध्ये ११ ते १९ जून २०२४ दरम्यान उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे १९२ बेघर लोकांचा मृत्यू झाला आहे.' गेल्या वर्षी ११ जून ते १९ जून या कालावधीच्या तुलनेत २०२४ मधील मृत्यूंची संख्या खूप जास्त आहे. मृतदेहांपैकी ८० टक्के मृतदेह बेघर लोकांचे आहेत.
वर्ष | मृत्यू |
२०१९ | १४३ |
२०२० | १२४ |
२०२१ | ५८ |
२०२२ | १५० |
२०२३ | ७५ |
२०२४ | १९२ |
तापमान वाढण्याचे कारण काय?
वायू प्रदूषण, जलद औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि जंगलतोड यामुळे वाढत्या तापमानामुळे बेघर लोकांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी शुद्ध पिण्याचं पाणी मिळणं हे देखील एक मोठं आव्हान आहे, ज्यामुळे डिहायड्रेशन आणि त्यासंबंधीचे इतर आजार होत आहेत.
याशिवाय उष्णतेमुळे जुनाट आजार आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या ऋतूत जुनाट आजार वाढतात. पैशांच्या कमतरतेमुळे, बरेच बेघर लोक सनस्क्रीन, टोपी किंवा हलके कपडे खरेदी करू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना थेट सूर्यप्रकाशापासून हानी पोहोचते.
भीषण परिस्थिती असूनही, बेघर लोकांना दीनदयाल राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM-SUH) आणि प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) सारख्या सरकारी कल्याणकारी कार्यक्रमांचा लाभ मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे ना ओळखपत्र आहे ना कायमचा पत्ता. सुनील कुमार अलेदिया म्हणाले की, अशा लोकांना फूटपाथवर दिवस काढण्याशिवाय पर्याय नाही. या गंभीर परिस्थितीत कुलिंग सेंटर, शेल्टर होमची व्यवस्था करणे, पाणी आणि घरं उपलब्ध करून देणं यासारख्या मूलभूत गरजांकडे लक्ष द्यावं लागेल.