चिंताजनक! लसीचे दोन्ही डोस घेऊनही एकाच रुग्णालयातील २५% कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 02:54 PM2021-08-31T14:54:42+5:302021-08-31T14:55:11+5:30
दिल्लीतील एकाच रुग्णालयातील २५ टक्के आरोग्य कर्मचारी दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाबाधित
दिल्ली: कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या एकाच रुग्णालयातील २५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र यातल्या कोणालाही रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही. कारण त्यांची प्रकृती चिंताजनक नव्हती. एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे.
द हिंदूनं दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली आणि गुरुग्राममधील मॅक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या ६०० आरोग्य कर्मचाऱ्यांचा सर्वेक्षणात सहभाग होता. इंस्टिट्यूट ऑफ जीनॉमिक्स एँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीच्या (आयजीआयबी) शास्त्रज्ञांनी हे सर्वेक्षण केलं. लसीकरण पूर्ण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या २५ टक्के लोकांमध्ये एँटीबॉडी आढळून आल्या. 'लसीकरण पूर्ण झालेल्या २५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी २५ टक्के कर्मचारी सौम्य संक्रमित झाल्याचा अंदाज आहे. कोरोनाचे अनेक व्हेरिएंट असल्यानं या कर्मचाऱ्यांनी त्यांची चाचणी करून घ्यायला हवी,' असं आयजीआयबीचे शास्त्रज्ञ शांतनु सेनगुप्ता यांनी सांगितलं.
देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कमी झाला आहे. मात्र जगभरात कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट वेगानं पसरत आहे. देशात दररोज कोरोनाचे ३० ते ४० हजार रुग्ण आढळून येत आहेत. यापैकी बहुतांश रुग्ण डेल्टा व्हेरिएंटचे आहेत. डेल्टा व्हेरिएंट पहिल्यांदा २०२० मध्ये भारतात सापडला.