IAS बनण्यासाठी दिल्लीला पाठवलं, TV वर समजली मृत्यूची बातमी; कुटुंबाचं स्वप्न भंगलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 11:54 AM2024-07-28T11:54:01+5:302024-07-28T11:56:18+5:30
दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगरमध्ये घडलेल्या दुर्घटनेत ३ निष्पाप जीव गेले आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नवी दिल्ली - ओल्ड राजेंद्र नगरच्या Rau's IAS स्टडी सेंटरच्या बेसमेंटमध्ये अचानक पाणी शिरल्याने ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगर जिल्ह्यातील श्रेया यादव या विद्यार्थिनीचाही समावेश आहे. श्रेयाच्या मृत्यूची बातमी तिच्या कुटुंबाला मिळताच बरसावा हाशिमपूर गावात शोककळा पसरली आहे. श्रेया भविष्यात IAS अधिकारी बनून गावात येईल हे स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबाला तिच्या अचानक जाण्यानं मोठा धक्का बसला आहे.
श्रेयाच्या मृत्यूनंतर तिचे काका धर्मेंद्र यादव म्हणाले की, जेव्हा आम्ही काल रात्री टीव्ही बघत होतो तेव्हा राजेंद्र नगर इथल्या स्टडी सेंटरची बातमी पाहिली. ही बातमी पाहून मी तातडीने राजेंद्र नगरला जिथे हॉस्टेल आणि कोचिंग सेंटर आहे तिथे पोहचलो पण मला माझ्या पुतणीविषयी माहिती मिळाली नाही. घटनास्थळावर एका अधिकाऱ्याने श्रेया यादव नावाच्या एका मुलीला हॉस्पिटलला नेले असून तिथे तिचा मृत्यू झाल्याचं सांगितले.
धर्मेंद्र यादव रात्रीपासून आरएमएल हॉस्पिटलमध्ये आहेत. परंतु त्यांना अद्याप पुतणी श्रेयाचा मृतदेह पाहता आला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, जोपर्यंत पोलीस पोहचणार नाही तोपर्यंत मृतदेह मिळणार नसल्याचं प्रशासनानं त्यांना कळवलं. मृतकांच्या यादीत पुतणी श्रेया यादव हिचं नाव असल्याने नातेवाईक, कुटुंबात आणि गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
कुटुंबाचं स्वप्न तुटलं...
खूप अपेक्षा ठेवून श्रेयाला दिल्लीत IAS अधिकारी बनण्यासाठी पाठवलं होतं. ती राजेंद्र नगरच्या कोचिंग सेंटरमध्ये तयारी करत होती. परंतु तिथल्या ढिसाळ कारभारामुळे आज ती आमच्यात नाही. या सेंटरचे जे मालक आणि संचालक आहेत त्यांच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मृत श्रेयाचे काका धर्मेंद्र यादव यांनी केली आहे.
नेमकं काय घडलं?
शहरातील ओल्ड राजेंद्र नगर येथील IAS स्टडी सेंटरच्या बेसमेंटमध्ये अचानक पाणी शिरलं, त्यात अनेक मुलं अडकली. रेस्क्यू ऑपरेशन करत काही मुलांना वाचवण्यात आले. परंतु या दुर्घटनेत २ युवती आणि एका युवकाचा मृत्यू झाला आहे. एकीकडे दिल्ली सरकारने या घटनेचे न्यायालयीन तपासाचे आदेश दिले आहेत तर दुसरीकडे सिव्हिल सर्व्हिसची कोचिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घटनेविरोधात निदर्शने सुरू केली आहेत. या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे.
सुरुवातीच्या तपासात बेसमेंटमध्ये ही लायब्रेरी होती. तिथे अचानक पाणी भरू लागलं. रस्सी फेकून अनेकांना बाहेर काढण्यात आले. संध्याकाळी ७ च्या सुमारास आम्ही बाहेर निघत होतो, तेव्हा अचानक वेगाने पाणी आलं. जोपर्यंत आम्ही लायब्रेरी रिकामी करू तोपर्यंत गुडघ्यापर्यंत पाणी भरलं होतं. पाण्याचा वेग इतका जास्त होता ज्यामुळे आम्हाला पायऱ्या चढत्या आल्या नाहीत. २-३ मिनिटांतच बेसमेंटमध्ये पूर्ण पाणी भरलं. जवळपास १०-१२ फूट हे पाणी होतं. त्याठिकाणाहून बाहेर निघण्यासाठी रस्सी फेकण्यात आली परंतु पाणी खूप खराब असल्याने काहीच दिसत नव्हते असं एका प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याने सांगितले.