'...ये तो बस ट्रेलर है'; दिल्ली स्फोटाबाबत मोठा खुलासा, लिफाफ्यातून समोर आलं 'इराण कनेक्शन'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 10:59 AM2021-01-30T10:59:49+5:302021-01-30T11:01:47+5:30
Delhi Israel embassy blast Iran connection revealed from envelope
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतीलइस्रायली दूतावासाजवळ शुक्रवारी झालेल्या स्फोटाशी संबंधित एक लिफाफा सापडला आहे. यातून स्फोटाचे इराण कनेक्शन समोर आले आहे. या लिफाफ्यात हा स्फोट म्हणजे ट्रेलर असल्याचे सांगण्यात आले असून बदल्याची भाषा करण्यात आली आहे. एवढेच नाही तर, यात 2020 मध्ये मारल्या गेलेल्या कासिम सुलेमानी आणि इराणचे वरिष्ठ न्यूक्लियर सायंटिस्ट मोहसिन फखरीजादेह यांचाही उल्लेख आहे.
लिफाफ्यातून समोर आलेल्या माहितीनंतर, या घटनेमागे इराण कनेक्शन असल्याची शंका बळावली आहे. यापूर्वी 2012 मध्ये इस्रायलच्या एका कारमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटातही इराणचेच दोन लोक सहभागी होते. या घटनेनंतर ते फरार झाले होते. विशेष म्हणजे हे लोक दिल्ली येथील पहाडगंज हॉटेलमध्ये थांबले होते. गुप्तचर संस्थां अद्यापही त्यांच्या शोधात आहेत.
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर अमित शाह अॅक्शन मोडमध्ये, बंगाल दौरा रद्द; दिले असे निर्देश
इस्रायली परराष्ट्र मंत्रालयाने हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. तसेच, या घटनेसंदर्भात परराष्ट्रमंत्री गाबी अश्केनजी यांना नियमितपणे अपडेट दिले जात आहेत, असेही इस्रायली परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय, त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेशही दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणा या लिफाफ्याची टच डीएनए करणार आहे. मोसाद संदर्भात सांगण्यात येत आहे, की ही संस्था आपल्या पातळीवर काम करते. मात्र, अद्याप मोसाद घटनास्थळी आल्याचे कुठलेही वृत्त नाही.
शाह यांचा बंगाल दौरा रद्द -
दिल्लीत झालेल्या या स्फोटानंतर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी संरक्षण अधिकाऱ्यांसो बैठक केली. या बैठकीला संरक्षण आणि गुप्तचर संस्थांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत दिल्ली पोलिसांना याप्रकरणी लवकरात लवकर तपास पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच गुप्तचर संस्थांनाही दिल्ली पोलिसांना शक्त ती सर्वप्रकारची मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गृह मंत्री आज शनिवारीही बैठक घेऊन आढावा घेऊ शकतात.
दिल्ली स्फोट - इस्रायली दूतावासाबाहेर पोलिसांना सापडले बंद पाकीट, CCTV तूनही पुरावे हाती
मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश -
दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले आहेत. "दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांशी चर्चा करून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले," असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे. तसेच "राज्यातील जनतेनेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे," असे आवाहनही त्यांनी केले आहे.