दिल्लीतील वकिलांचे काम तिसऱ्या दिवशीही बंद; आत्मदहनाचा दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 06:59 AM2019-11-07T06:59:20+5:302019-11-07T06:59:26+5:30
पक्षकारांना न्यायालयात येण्यापासून रोखले
नवी दिल्ली : तीस हजारी न्यायालयाच्या संकुलात वकील व पोलीस यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीच्या निषेधार्थ राजधानीच्या सहा कनिष्ठ न्यायालयांतील वकिलांनी बुधवारीही कामकाजावर बहिष्कार घातला. पतियाळा हाऊस तसेच साकेत जिल्हा न्यायालयांची प्रवेशद्वारे बंद करून वकील पक्षकारांना न्यायालयात येण्यास मज्जाव करत होते.
रोहिणी जिल्हा न्यायालयात एका वकिलाने अंगावरील कपडे उतरवून अंगावर रॉकेल ओतून घेतले व आत्मदहनाचा इशारा दिला. दुसºया वकिलाने न्यायालयच्या इमारतीच्या गच्चीत जाऊन आपला निषेध व्यक्त केला. न्यायालयाच्या आवारामध्ये एकही पोलीस अधिकारी नसल्याने पक्षकारांची सुरक्षा तपासणी कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. पक्षकारांच्या बुरख्याआड समाजकंटकही न्यायालयात येण्याची शक्यता होती. त्यामुळे सर्वच पक्षकारांना सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयात येण्यापासून रोखले जात होते असे दिल्ली बार असोसिएशनच्या सदस्यांनी सांगितले.
साकेत न्यायालयाबाहेर मोटरसायकलवरील एका पोलिसाला मारहाण करणाºया अज्ञात व्यक्तिंविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वकिलांनी केलेल्या मारहाणीविरोधात दिल्ली पोलिसांनी केलेल्या निदर्शनांची सविस्तर माहिती त्या शहराचे पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांना आज दिली. वकील व पोलिसांमधील विश्वास कायम राखणे आवश्यक आहे असे बैजल यांनी मंगळवारी म्हटले होते. वकील व पोलिसांमधील धुमश्चक्रीमधील दोषी व्यक्तींना कडक शिक्षा करावी अशी मागणी आॅल इंडिया असोसिएशन आॅफ आयआरएस (इन्कम टॅक्स) या संघटनेने केली आहे.
मारहाणीची चौकशी करा
दिल्ली पोलिसांनी मंगळवारी केलेली निदर्शने हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. ही निदर्शने राजकीय हेतूंनी प्रेरित असून त्याची निष्पक्षपाती चौकशी करावी अशी मागणी बार कौन्सिल आॅफ इंडियाचे (बीसीआय) अध्यक्ष मननकुमार मिश्रा यांनी बुधवारी केली आहे. पोलीस, वकील, जनता यांच्यासह कोणीही हिंसक प्रकार केले तर त्याची गय केली जाणार नाही असे बीसीआयने म्हटले आहे.