रोज १००० हून अधिक नवे रुग्ण, एका व्यक्तीपासून दोन व्यक्तींना लागण; दिल्लीत चौथ्या लाटेला सुरुवात?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 12:56 PM2022-04-24T12:56:45+5:302022-04-24T12:57:17+5:30
नवी दिल्ली - दिल्लीत शनिवारी पुन्हा एकदा १ हजाराहून नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. १० फेब्रुवारी २०२२ नंतरचा ...
नवी दिल्ली-
दिल्लीत शनिवारी पुन्हा एकदा १ हजाराहून नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. १० फेब्रुवारी २०२२ नंतरचा हा सर्वात मोठा आकडा आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी ५२ अधिक रुग्ण नोंदवले गेले. दिल्लीत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा ३,७०५ वर पोहोचली आहेत, हा आकडा १३ फेब्रुवारीपासूनचा सर्वाधिक आकडा आहे. पॉझिटीव्हिटी रेट देखील ४.८२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. शनिवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, त्यानंतर मृतांची संख्या २६,१६६ वर पोहोचली आहे. आयआयटी मद्रासच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की दिल्लीत कोविडची R व्हॅल्यू २ च्या वर गेले आहे. म्हणजेच एका संक्रमित व्यक्तीकडून दोन लोकांमध्ये कोरोनाचा प्रसार होत आहे. मात्र, दिल्लीत कोरोनाच्या चौथ्या लाटेची पुष्टी होण्यासाठी थोडा वेळ थांबावं लागेल, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. देशभरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ एप्रिल रोजी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे.
दिल्लीतील कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी
१५ एप्रिल- ३६६ रुग्ण
१६ एप्रिल- ४६१ रुग्ण
१७ एप्रिल- ५१७ रुग्ण
१८ एप्रिल- ५०१ रुग्ण
१९ एप्रिल- ६३२ रुग्ण
२० एप्रिल- १००९ रुग्ण
२१ एप्रिल- ९६५ रुग्ण
२२ एप्रिल- १०४२ रुग्ण
२३ एप्रिल- १०९४ रुग्ण
दिल्लीत एका रुग्णाकडून प्रत्येकी दोघांना कोरोनाची लागण
दिल्लीत कोरोना ग्रस्त प्रत्येक व्यक्ती हा विषाणू इतर दोन लोकांना पसरवत आहे. आयआयटी मद्रासच्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. त्यानुसार, या आठवड्यात व्हायरसचा प्रसार दर्शवणारे 'आर-व्हॅल्यू' दिल्लीत २.१ नोंदवली गेली आहे. याचा अर्थ दिल्लीतील एक कोविड रुग्ण २ पेक्षा जास्त लोकांना संक्रमित करत आहे. जर हे मूल्य १ च्या खाली गेले तर असं मानले जाते की महामारी संपली आहे. आयआयटी-मद्रासच्या या अभ्यासानुसार देशातील 'आर-व्हॅल्यू' सध्या १.३ आहे.
दिल्लीतील चौथ्या लाटेची ही सुरुवात आहे का?
"चौथ्या लाटेच्या घोषणेसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. लोकांमधील विषाणूंविरूद्ध प्रतिकारशक्तीची स्थिती आम्हाला अद्याप माहित नाही. जानेवारीतील तिसऱ्या लाटेत बाधित झालेल्या लोकांना पुन्हा संसर्ग होत आहे की नाही हे देखील माहित नाही", असं आयआयटी मद्रासचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. जयंत झा म्हणाले. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात दिल्लीतून घेतलेल्या बहुतेक नमुन्यांमध्ये ओमायक्रॉनचे उप-प्रकार BA.2.12 आढळून आले आहेत. राजधानीतील रुग्णसंख्येची वाढ होण्यामागे हा प्रकार असू शकतो.
शनिवारी गुडगावमध्ये कोरोनाचे २९१ रुग्ण आढळले. संसर्ग दर 8.14% पर्यंत वाढला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १,२१८ आहे. बरे झालेल्या लोकांची संख्याही एका महिन्यात सर्वाधिक म्हणजे २३८ होती. नोएडामध्ये १२७ प्रकरणे आढळली असून त्यापैकी १७ विद्यार्थी आहेत. सध्या चार रुग्ण रुग्णालयात आहेत. गाझियाबादमध्ये ४६ आणि फरिदाबादमध्ये २३ नवीन रुग्ण आढळले आहेत. गाझियाबादच्या रुग्णांमध्ये १५ विद्यार्थी आहेत.