दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाची जोरदार मुसंडी, सातही जागांवर आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 07:33 PM2019-05-23T19:33:01+5:302019-05-23T19:49:19+5:30
उत्तर-पूर्व दिल्लीतील मतदार संघात भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी आघाडीवर आहे. मनोज तिवारी यांना साडे सात वाजेपर्यंत 785262 मतं मिळाली आहेत.
नवी दिल्ली - देशाची राजधानी असलेली दिल्ली काबीज करण्यासाठी सगळेच पक्ष प्रयत्नशील आहे. दिल्ली येथे लोकसभेच्या एकूण 7 जागा आहेत. या जागेवर मागील निवडणुकीत भाजपाने एकहाती कब्जा केला होता. त्यामुळे या जागांवर विजय मिळविण्यासाठी आप आणि काँग्रेस प्रयत्नशील आहेत. 2009 मध्ये सर्व जागांवर कब्जा करणाऱ्या काँग्रेसला 2014 मध्ये केवळ 15 टक्के मतांवरच समाधान मानावे लागले आणि काँग्रेसचा एकही उमेदवार त्या निवडणुकीत विजयी झाला नाही.
दिल्लीमध्ये मतमोजणी सुरू असून भाजपाने आघाडी घेतली आहे. सातही जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. उत्तर-पूर्व दिल्लीतील मतदार संघात भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी आघाडीवर आहे. मनोज तिवारी यांना साडेसात वाजेपर्यंत 785262 मतं मिळाली आहेत. त्यांच्याविरोधात आपचे उमेदवार दिलीप पांडे आणि काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षा शीला दीक्षित निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. आपच्या दिलीप पांडे यांना 190586 मतं तर काँग्रेसच्या शीला दीक्षित यांना 421291 मतं मिळाली आहेत.
Lok Sabha Election 2019 Result: लवली आणि आतिषी यांचा समाचार घेत गौतमचं ‘गंभीर’ ट्विट https://t.co/uMMF17efJ8
— Lokmat (@MiLOKMAT) May 23, 2019
क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या गौतम गंभीरने राजकारणाच्या मैदानावरही दमदार बॅटिंग केली. भाजपाच्या तिकिटावर पूर्व दिल्लीतून उभ्या राहिलेल्या गंभीरला 695109 मतं मिळाली आहेत. आम आदमी पक्षाच्या आतिशी यांना 219156 मतं तर काँग्रेसचे अरविंद सिंह लवली यांना 304718 मतं मिळाली आहेत. काँग्रेसच्या अरवींद सिंग लवली आणि आम आदमी पार्टीच्या आतिषी यांच्यावर क्रिकेटमधील काही शब्द वापरत गंभीरने खरमरीत टीका केली आहे. गंभीर आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे की, “ ‘लवली’ कव्हर ड्राइव्ह नाही किंवा ‘आतिषी’ फलंदाजी नाही, तर हा भाजपाच्या ‘गंभीर’ विचारसरणीला लोकांनी दिलेला पाठिंबा आहे.“
भाजपाच्या प्रज्ञा सिंग ठाकूर आघाडीवर https://t.co/fUWIufFuiq#LokSabhaElectionresults2019pic.twitter.com/vLcx9l5XKf
— Lokmat (@MiLOKMAT) May 23, 2019
दिल्लीमध्ये भाजपा आणि आपची प्रतिष्ठा लागली पणाला, काँग्रेसच्या प्रबळ उमेदवारांमुळे लढतींमध्ये रंगत आहे. काँग्रेस व आप हे एकमेकांची किती मते ओढतात. यावरच भाजपाचे यश अवलंबून आहे. या निवडणुकीत काही जागा गमाविल्यास भाजपाला धक्का बसेल. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आपमध्ये आघाडीबाबत अनेकवेळा चर्चा झाल्या मात्र आघाडी फिस्कटल्याने अखेर काँग्रेस आणि आम आदमी पक्ष स्वतंत्र्यपणे दिल्ली लोकसभा निवडणूक लढवत आहे.
पूर्व दिल्ली
माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर दिल्ली पूर्व लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्याच्यासमोर आम आदमी पक्षाच्या आतिशी आणि काँग्रेसचे अरविंद सिंह लवली यांचे आव्हान आहे.
नवी दिल्ली
भाजपाच्या मीनाक्षी लेखी येथील खासदार आहेत. त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी आव्हान दिले आहे. तर आपने ब्रिजेश गोयल यांना उमेदवारी दिली आहे
चांदणी चौक
चांदनी चौक दिल्लीतला सर्वात लहान मतदारसंघ आहे. या ठिकाणी 15 लाख 61 हजार 828 मतदार आहेत. या मतदारसंघात भाजपाकडून डॉ. हर्षवर्धन, काँग्रेसकडून जयप्रकाश अग्रवाल आणि आपकडून पंकज गुप्ता मैदानात आहेत.
पश्चिम दिल्ली
काँग्रेसने पश्चिम दिल्ली येथून महाबल मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने प्रवेश वर्मा यांच्यावर विश्वास दाखविला आहे. आपने बलबीरसिंग जाखड यांना उमेदवारी दिली आहे.
दक्षिण दिल्ली
काँग्रेसनं बॉक्सर विजेंदर सिंहला दक्षिण दिल्लीतून उमेदवारी दिली आहे. भाजपाने रमेश बिधुडी यांच्यावरच विश्वास व्यक्त केला आहे. आपने राघव चढ्ढा यांना उमेदवारी दिली आहे.
उत्तर-पूर्व दिल्ली
उत्तर-पूर्व दिल्लीतील मतदार संघातून आपचे उमेदवार दिलीप पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी आणि काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षा शीला दीक्षित निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.
उत्तर-पश्चिम दिल्ली
भाजपाने या मतदारसंघात पंजाबी गायक हंसराज हंस यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने राजेश लिलोठिया यांना उमेदवारी दिली आहे. तर आपने गुग्गन सिंह यांना उमेदवारी दिली आहे.
लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह 2019: सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएने मारली मुसंडी https://t.co/b2zmzSeizX
— Lokmat (@MiLOKMAT) May 23, 2019