माकडांचा हैदोस; भाजप खासदाराला घेतला चावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 04:49 PM2019-09-09T16:49:29+5:302019-09-09T16:50:20+5:30
दिल्ली सारख्या शहरात माकडांचा प्रचंड हैदोस पाहायला मिळत आहे.
नवी दिल्ली – दिल्लीत माकडांची दहशत दिवसेंदिवस वाढते आहे. अनेक सुरक्षित इमारतींत माकडं घुसखोरी करताना दिसतात. खासदार राहत असलेल्या शासकीय निवासातील परिसरात सुद्धा माकडांनी उच्छाद मांडला आहे. तर भाजपचे खासदार राकेश सिन्हा यांच्यावर माकडाने हल्ला करत चावा घेतल्याने खळबळ उडाली आहे. तसेच माकडांच्या भीतीने सिन्हा यांच्याकडे कामाला असलेल्या चार कामगारांनी नोकरी सोडली असल्याचे ते म्हणाले.
दिल्ली सारख्या शहरात माकडांचा प्रचंड हैदोस पाहायला मिळत आहे. या माकडांनी अशी भीती निर्माण केली आहे, की सामान्य लोकांपासून ते मोठे मंत्री आणि नेते सुद्धा त्यांना घाबरत आहे. गेल्यावर्षी सुद्धा माकडांनी एका खासदारावर हल्ला केला होता. मात्र त्यात ते थोडक्यात वाचले, पण त्यांच्या मुलाला माकडाने चावा घेतला. त्यावेळी अखेर संसदेलाही या प्रकरणी काही पावलं उचलावी लागली आणि त्यांनी माकडांच्या गोंधळाला तोंड देण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वं जारी केली होती.
दिल्लीतील लुटियन झोनमधील खासदारांच्या निवासस्थानाभोवती माकडांनी उच्छाद मांडला आहे. अनेक प्रयत्नांनंतरही ना त्यांचा गोंधळ कमी होतोय, ना त्यांच्यावर ताबा मिळवता येतोय. त्यामुळे प्रशासन सुद्धा हतबल झाले आहे. प्रशासनाने परिपत्रक काढून नेत्यामंडळींनाच माकडांच्या हल्ल्यापासून बचाव करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे ह्या माकडांचा बंदोबस्त करणे प्रशासनसमोर मोठे आव्हान ठरत आहे .