उघड्यावर लघुशंका करण्याला केला विरोध; तरुणाने दुसऱ्या दिवशी येऊन केली बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 11:51 AM2024-10-06T11:51:28+5:302024-10-06T11:53:51+5:30
दिल्लीत उद्यान स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला तरुणाने जबर मारहाण केली आहे.
Delhi Crime :दिल्लीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. देशाची राजधानी दिल्लीत एका व्यक्तीला उद्यान स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला काठीने बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण झालेल्या व्यक्तीने आरोपीला उद्यानात लघवी करण्यास मनाई केली होती. याचाच राग येऊन आरोपीने दुसऱ्या दिवशी मित्रांसह त्या व्यक्तीला गाठले आणि बेदम मारहाण केली. यानंतर तो बाईकवर बसून निघून गेला. हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला. मात्र, नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
उत्तर पश्चिम दिल्लीतील मॉडेल टाऊन भागात हा सगळा प्रकार घडला आहे. शुक्रवारी दुपारी एका तरुणाने फूटपाथवर भगव्या रंगाची चादर पांघरून झोपलेल्या व्यक्तीवर काठीने हल्ला करण्यास सुरुवात केली. ती व्यक्ती उठून बसल्यावरही हल्लेखोर त्याच्यावर काठीने हल्ला करत राहिला आणि मारहाण केल्यानंतर बाईकवरुन पळून गेला.
तिथल्या एका सीसीटीव्हीमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार कैद झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना काठीने मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव आर्यन असल्याचे समजले. त्याच भागातील एका वृद्ध व्यक्तीकडे तो नोकर म्हणून काम करत होता. गुरुवारी आर्यन तिथल्या एका उद्यानाजवळ उघड्यावर लघवी करत होता. त्यामुळे जवळच असलेल्या एका दुकानात काम करणाऱ्या रामफल नावाच्या व्यक्तीने त्याला अडवले आणि उघड्यावर लघवी करु नको असं सांगितलं. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आर्यन तिथून निघून गेला. मात्र दुसऱ्याच दिवशी पूर्ण तयारीनिशी आला आणि त्याने आपला सगळा राग रामफलवर काढला.
शुक्रवारी आर्यन त्याच्या दोन मित्रांसह बाईकवरुन काठी घेऊन आला. फूटपाथवर झोपलेल्या रामफलजवळ तो पोहोचला. त्याची चादर बाजूला काढून तो रामफस आहे की अन्य कोणी आहे, हे त्याने पाहिले. झोपलेली व्यक्ती रामफल असल्याचे कळताच आर्यनने त्याला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक हल्ला झाल्याने रामफल उठून बसला. मात्र आर्यन त्याला मारहाण करत राहिला. राग शांत झाल्यावर तो थांबला आणि आणि मित्रांकडे निघून केला. त्यानंतर बाईकवर बसून त्याने तिथून पळ काढला.
दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी आर्यनविरुद्ध मारहाण आणि भांडणाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मात्र, त्यानंतर आर्यनची जामीनवर सुटका करण्यात आली.