गुजरातबरोबर दिल्लीतही केजरीवालांची कसोटी, निवडणुकीची घोषणा, असा आहे कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 05:17 PM2022-11-04T17:17:50+5:302022-11-04T17:18:44+5:30
Delhi MCD Election : निवडणूक आयोगाने दिल्ली महानगपालिकेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. दिल्ली महानगरपालिकेसाठी ४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ७ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होतील.
नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने सत्ताधारी भाजपासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. मात्र गुजरातमध्ये जोरदार मोर्चेबांधणी करत असलेल्या आपची आता दिल्लीमध्ये कसोटी लागणार आहे. निवडणूक आयोगाने दिल्ली महानगपालिकेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. दिल्ली महानगरपालिकेसाठी ४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ७ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होतील.
दिल्लीमध्ये यावर्षी एप्रिल महिन्यात नगरपालिकेची निवडणूक होणार होती. तिन्ही महानगरपालिकांचं पुन्हा एकदा एकत्रिकरण करून एकच महानगरपालिका करण्याची योजना आखली होती. त्यामुळे ८ मार्च रोजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. के. श्रीवास्तव यांना निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यापूर्वी काही तास आधी रोखण्यात आले होते.
दिल्लीमध्ये असलेल्या तीन महानगरपालिकांचे मे महिन्यामध्ये एकत्रिकरण करण्यात आले होते. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये प्रभागांच्या पुनर्रचनेचं काम हाती घेण्यात आलं होतं. केंद्रीय गृहमंत्रालयाने १७ ऑक्टोबर रोजी दिल्लीमधील महानगरपालिकेच्या प्रभागांच्या पुनर्रचनेसाठी अंतिम गॅझेट अधिसूचना जारी केली होती.
दिल्लीमध्ये आधी उत्तर दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्ली महानगरपालिका अशा तीन महानगरपालिका होत्या. त्यांचे मे २०२२ मध्ये पुन्हा एकदा एकत्रिकरण करण्यात आले होते. त्यापैकी उत्तर आणि दक्षिण दिल्ली महानगरपालिकांमध्ये प्रत्येकी १०४ प्रभाग होते. तर पूर्व दिल्ली महानगर पालिकेमध्ये ६४ वॉर्ड होते. पुनर्रचनेनंतर आता दिल्लीमध्ये प्रभागांची संख्या २५० एवढी करण्यात आली आहे. त्यापैकी ४२ प्रभाग हे अनुसूचित जातींसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.