Delhi MCD Election Results 2022: भाजपाला धक्का देण्यात पुन्हा यशस्वी झाले केजरीवाल; 'आप'ची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 12:51 PM2022-12-07T12:51:12+5:302022-12-07T13:11:15+5:30
दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आपची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा भाजपला धक्का देण्यात यशस्वी ठरले आहेत.
नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आपची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा भाजपला धक्का देण्यात यशस्वी ठरले आहेत. या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत झाली. १३४९ उमेदवारांनी निवडणूक लढवली. भाजपने यात २५० जागांवर उमेदवार उभे केले तर आम आदमी पक्षानेही २५० जागांवर उमेदवार दिले होते.
मिळालेल्या आकडेवारीनुसार आम आदमी पक्षाची १३३ जागांवर आघाडी आहे, तर भाजपची १०४ जागांवर आघाडी आहे. बहुमतासाठी १२६ जागांचा आकडा गाठायचा आहे, आम आदमी पक्षाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आप भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे.
बहुमतासाठी किमान १२६ जागा जिंकाव्या लागतील, MCD मध्ये एकूण २५० जागा आहेत. पूर्ण बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला किमान १२६ जागा जिंकाव्या लागतील. दिल्ली महानगरपालिका गेल्या १५ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. याअगोदर राजधानी महानगरपालिकेचे ३ भागात विभाजन करण्यात आले होते. एमसीडी निवडणुकीत एकूण १३४९ उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. त्यापैकी ३८२ उमेदवार अपक्ष आहेत. भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षाने सर्व २५० जागांसाठी आपले उमेदवार उभे केले, तर काँग्रेसने केवळ २४७ उमेदवार उभे केले.
तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांचा मतदारसंघ असलेल्या ७४ मध्ये भाजपाचे रवींद्र कुमार सध्या आघाडीवर असल्याचे दिसत आहे. रविंद केजरीवाल हे चांदणी चौकाचे मतदार आहेत. तसेच दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांच्या लक्ष्मीनगर मतदारसंघात भाजपाच्या अलका राघव आघाडीवर आहेत. आपच्या मीनाक्षी शर्मा सध्या पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींच्या मतदारसंघात कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.