दिल्ली मेट्रोचे जाळे झाले ३९२ कि.मी.चे; ढासा बस स्टॅण्ड-नजफगड विभागातील ५० गावे मेट्रोला जोडली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 02:37 PM2021-09-20T14:37:51+5:302021-09-20T14:38:07+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रे मार्गावर नजफगड ते ढासा बस स्टँड मेट्रो स्थानकादरम्यान मेट्रो परिचालनास हिरवा झेंडा दाखवला.
विकास झाडे -
नवी दिल्ली : लोकल प्रवासासाठी दिल्लीकरांना सर्वोत्तम पर्याय म्हणजे दिल्ली मेट्रो आहे. संपूर्ण दिल्ली, एनसीआरमध्ये मेट्रोचे जाळे ३९२ कि.मी. पर्यंत विखुरले आहे. आज ५० गावे जोडल्या गेल्याने मेट्रो स्थानकांची संख्या ही २८६ झाली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रे मार्गावर नजफगड ते ढासा बस स्टँड मेट्रो स्थानकादरम्यान मेट्रो परिचालनास हिरवा झेंडा दाखवला. ग्रे लाइनच्या या कॉरिडॉरवर कामकाज सुरू झाल्यामुळे नजफगड आणि ढासा सीमेच्या आजूबाजूची सुमारे ५० गावे दिल्ली मेट्रो नेटवर्कशी जोडली गेली आहेत.
नजफगडच्या शहरी भागात असलेली ग्रे लाइन मेट्रो आता ग्रामीण भागात पोहोचली आहे. नजफगड-ढासा बस स्टॅण्ड मेट्रो कॉरिडॉर सामान्य जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. दिल्ली सीमेवरील हरयाणातील बहादूर शहर-ग्रामीण भागातील लोकांनाही याचा फायदा होईल. नजफगड-ढासा बस स्टॅण्ड मेट्रो कॉरिडॉर सुरू केल्यामुळे ढासा स्टॅण्डच्या आसपासची सुमारे दोन डझन गावे तसेच बहादूरगडच्या लोकांची सोय होईल. ग्रामीण भागातील लोकांसाठी ही आनंदाची बाब असून, आता राजधानी दिल्लीच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाण्यासाठी लोकांना अडचणी येणार नाहीत, असे स्थानिकांनी सांगितले.
नजफगड-ढासा बस स्टॅण्ड मेट्रो कॉरिडॉर सुरू केल्याने ढासा, मित्रुन, सुरहेरा, खडकाडी, कार, झारोडा कलान, कांगान्हेरीसह इतर अनेक गावांतील लोकांना सुविधा मिळेल. तत्पूर्वी त्यांना मेट्रोसाठी नजफगडला यावे लागले. आता त्यांना थेट द्वारका ते ढासा बस स्टॅण्ड ते वैशाली आणि नोएडापर्यंत ब्लू लाइन मेट्रोने प्रवास करता येणार आहे.
नजफगड ते ढासा बस स्टॅण्ड मेट्रो कॉरिडॉर लांबी १.१८ किमी असून, या कॉरिडॉरमध्ये भूमिगत पार्किंगची सुविधा आहे. पार्किंगमध्ये ११० कार आणि १८५ दुचाकी वाहने पार्क केली जाऊ शकतात. या कॉरिडॉरवरील सुरक्षा तपासणी जुलैमध्येच पूर्ण झाली.