दिल्लीच्या आमदारांची बल्ले बल्ले, केजरीवाल सरकारकडून वेतनात बंपर वाढ, मंत्री, मुख्यमंत्र्यांनाही मिळणार दणकट पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 11:40 AM2023-03-13T11:40:50+5:302023-03-13T11:41:43+5:30
Delhi MLA Salary Increase: दिल्लीतील आमदारांना राज्यातील केजरीवाल सरकारने खूशखबर दिली आहे. दिल्लीतील आमदारांच्या वेतनामध्ये ६६ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे
दिल्लीतीलआमदारांना राज्यातील केजरीवाल सरकारने खूशखबर दिली आहे. दिल्लीतीलआमदारांच्या वेतनामध्ये ६६ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आता त्यांना दर महिन्याला ९० हजार रुपये मिळतील. यापूर्वी दिल्लीतील आमदारांना वेतन म्हणून ५४ हजार रुपये मिळत होते. जुलै २०२२ मध्ये दिल्लीच्या विधानसभेमध्ये आमदार आणि मंत्र्यांच्या पगारात वाढ करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर करून घेतले होते. आता या विधेयकाला राष्ट्रपतींकडून मान्यता मिळाल्यानंतर दिल्ली सरकारच्या विधी विभागाने वेतनात वाढ करण्यासंबंधीचं नोटिफिकेशन जारी केलं आहे.
दिल्लीतील आमदारांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये अखेरची वाढ ही २०११ मध्ये झाली होती. दरम्यान, गतवर्षी जुलै महिन्यामध्ये दिल्ली विधानसभेत मंत्री, आमदार, मुख्य प्रतोद, विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या वेतनामध्ये आणि भत्त्यांमध्ये वाढ करण्यासंबंधीची पाच विधेयके पारित करण्यात आली होती.
या विधेयकांना राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता दिल्लीतील आमदारांचं वेतन वाढून ५४ हजारांवरून ९० हजार रुपये एवढं झालं आहे. तर मंत्री, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्षनेते यांचे वेतन ७२ हजार रुपयांवरून वाढून १ लाख ७० हजार एवढं करण्यात आलं आहे.
याबाबत ९ मार्च रोजी दिल्ली सरकारच्या कायदे आणि न्याय व लोकप्रतिनिधींशी संबंधित विभागाने नोटिफिकेशन प्रसिद्ध केले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे या वेतनवाढीनंतरही दिल्लीतील आमदारांचं वेतन हे इतर राज्यातील आमदारांपेक्षा कमी आहे.