Delhi Mundka Fire: दुर्घटनेच्याच दिवशी बहिणीला पहिला वहिला पगार मिळाला, आता ती कुठंय कुणालाच ठावूक नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 08:47 AM2022-05-14T08:47:16+5:302022-05-14T08:47:44+5:30
आगीच्या मोठ मोठ्या ज्वाळा आणि काळाकुट्ट धूर...शुक्रवारी रात्री दिल्लीच्या मुंडका परिसरातील मेट्रो पीलर नंबर ५४५ जवळ असंच काहीसं भयंकर दृश्य होतं.
नवी दिल्ली-
आगीच्या मोठ मोठ्या ज्वाळा आणि काळाकुट्ट धूर...शुक्रवारी रात्री दिल्लीच्या मुंडका परिसरातील मेट्रो पीलर नंबर ५४५ जवळ असंच काहीसं भयंकर दृश्य होतं. एक इमारत आगीच्या ज्वाळांनी घेरली गेली होती. यात आतापर्यंत २७ जणांचा जीव गेला आहे. घडलेली घटना एक अपघात असला तरी ज्या लोकांनी आपल्या जवळच्यांना गमावलं त्यांचं काय? या घटनेत अजूनही १९ जण बेपत्ता आहेत.
आपल्या बहिणीच्या शोधात संजय गांधी हॉस्पीटलमध्ये पोहोचलेल्या अजित तिवारी यानं सांगितलेली कहाणी खूप वेदनादायी आहे. त्याची बहिण याच घटनेनंतर बेपत्ता आहे. "मी माझ्या बहिणीचा शोध घेतोय. गेल्याच महिन्यात तिनं या इमारतीत एका सीसीटीव्ही कॅमेरा पॅकेजिंग यूनिटमध्ये काम करायला सुरुवात केली होती आणि घटनेच्याच दिवशी तिला तिचा पहिला पगार मिळाला होता. पण आता ती कुठंय मला काहीच माहित नाही", असं अजित तिवारी हुंदके देऊन सांगत होता.
अजितनं दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी पाचच्या सुमारास आग लागल्याची माहिती मला मिळाली. पण ही आग माझी बहिण जिथं काम करते त्या इमारतीला लागलीय की दुसरीकडे हे काही कळू शकलं नाही. पण ती सात वाजले तरी घरी पोहोचली नाही म्हणून मी तिचा शोध घेवू लागलो. मोनिका आपल्या दोन भाऊ आणि एका बहिणीसोबत दिल्लीतील आगर नगर येथे वास्तव्याला आहे. ती मूळची उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातील रहिवासी आहे.
पूजाच्या कमाईवर चालत होतं घर
रुग्णालयात आणखी एक महिला आपल्या थोरल्या मुलीच्या शोधात पोहोचली. ती देखील सीसीटीव्ही कॅमेरा पॅकेजिंग युनिटमध्येच काम करत होती. महिलेनं सांगितलं की माझी थोरली मुलगी पुजा गेल्या तीन महिन्यांपासून इथं काम करत आहे. आम्ही मुबारकपुर येथे राहातो आणि रात्री ९ वाजता या घटनेची माहिती आम्हाला मिळाली. पुजाच्या उजव्या डोळ्याखाली एक निशाण आहे. ती आमच्या घरातील एकटी कमावणारी मुलगी आहे. तिला दोन लहान बहिणी असून त्यांचं अद्याप शिक्षण सुरू आहे. पुजाच्याच कमाईवर घरखर्च चालत होता. अनेक रुग्णालयांमध्ये मी तिचा शोध घेतला पण ती सापडत नाहीय.
२७ निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
आगीच्या या भयंकर घटनेतील हृदय पिळवटून टाकणाऱ्या कहाण्या ऐकल्या तर कुटुंबीयांवर काय परिस्थिती आली असेल याची केवळ कल्पनाच आपण करू शकतो. पण या घटनेत २७ निष्पाप लोकांचा बळी गेलाय. त्यासाठी जबाबदार कोण? यात कुणी आपला भाऊ, कुणाचे बाबा, कुणाची बहिण, कुणाही पत्नी तर कुणी आपला पती गमावला असेल. या सगळ्यांच्या कुटुंबीयांवर काय परिस्थिती ओढावली असेल याचा विचार करा. ज्या फॅक्ट्रीमध्ये आग लागली त्याच्या दोन्ही मालकांना पोलिसांनी अटक केली आहे. वरुण गोयल आणि सतीश गोयल यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.