प्रदूषणाचा विळखा! दिल्ली, नोएडामध्ये 'हेल्थ इमर्जन्सी' जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 02:28 PM2019-11-01T14:28:45+5:302019-11-01T14:31:55+5:30
वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने दिल्ली आणि नोएडामध्ये हेल्थ इमर्जन्सी लागू केली आहे.
नवी दिल्ली - दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. वायू गुणवत्ता खराब श्रेणींमध्ये आली असून पुढच्या आठवड्यात आणखी खालावण्याची शक्यता आहे. दिवाळीत फटाके फोडल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली असून श्वास घेणं ही लोकांसाठी कठीण झालं आहे. वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने दिल्ली आणि नोएडामध्ये हेल्थ इमर्जन्सी लागू केली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये 5 नोव्हेंबरपर्यंत बांधकामांवर बंदी घालण्यात आलेली आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील हवेची गुणवत्ता खूपच खराब आहे. वायू प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. दिल्ली सरकारने शुक्रवारी (1 नोव्हेंबर) शाळकरी मुलांना मास्कचे वाटप केले आहे. 'दिल्ली गॅस चेंबर बनत आहे. प्रदूषित हवेमुळे आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. शाळकरी मुलांना प्रदूषणाचा त्रास होऊ नये यासाठी 50 लाख मास्कचं वाटप करण्यात आलं आहे. दिल्लीतील नागरिकांनी देखील प्रदूषणाचे परिणाम टाळण्यासाठी मास्क वापरावेत' असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
Environment Pollution (Prevention & Control) Authority: This is a public health emergency as air pollution is now hazardous and will have adverse health impacts on all particularly the children. #DelhiNCRhttps://t.co/y2SAZlaLBJ
— ANI (@ANI) November 1, 2019
पंजाब आणि हरयाण सरकारने प्रदुषणाविरोधात कडक पावलं उचलण्याचं आवाहन काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं. मंगळवारी (29 ऑक्टोबर) केजरीवाल यांनी प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार प्रयत्नरत असल्याचे ट्विट देखील केले होते. दिल्लीतील प्रदुषणात वाढ झाली असून हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. प्रदुषणासंबंधी एका ट्विटर युजरने शेअर केलेली पोस्ट रिट्विट करून केजरीवाल यांनी हे आवाहन केले आहे.
Delhi: Chief Minister Arvind Kejriwal distributes masks to school students following rise in pollution levels in the city. pic.twitter.com/75xwWNqEHH
— ANI (@ANI) November 1, 2019
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी, तसेच सोमवारी आणि मंगळवारीही शहरात गॅस चेंबर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात रविवारी रात्रीपासूनच हवेची गुणवत्ता खालावली होती. शुद्ध हवेची गुणवत्ता ही 60 च्या घरात असते. अशातच हरयाणा आणि पंजाबमध्ये जाळण्यात येणाऱ्या पराळीमुळे प्रदुषणात वाढ होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत प्रदूषणकारी फटाके वाजवण्यावर बंदी घातली होती व हरित म्हणजे पर्यावरणपूरक फटाके वाजवण्याचा आदेश दिला होता. मात्र तरीही दिल्लीमध्ये प्रदूषण करणारे फटाके हे अनेक ठिकाणी फोडण्यात आले. त्यामुळे हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे.
बापरे! प्रदूषणामुळे उत्तर भारतातील लोकांचं आयुष्य 7 वर्षांनी घटलंhttps://t.co/wdkbASXhAL#AirPollution
— Lokmat (@MiLOKMAT) November 1, 2019
केंद्र सरकारच्या वायू गुणवत्ता व हवामान अंदाज प्रणाली व अनुसंधान (सफर) या संस्थेने हवेची गुणवत्ता खराब होण्यासाठी हवामानामध्ये होणारे बदल कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. दिल्लीच्या वातावरणात शेजारच्या राज्यांमध्ये पेंड्या जाळल्यामुळे प्रदुषणात 10 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिल्लीजवळील राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडून पराली जाळली जात असल्याने दिल्लीतील हवेची गुणवत्ता बिघडली असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते. पंजाब, हरयाणातील पराली जाळली जात असल्यामुळे दिल्ली-एनसीआरमधील हवेच्या गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा करण्यासाठी 10 सदस्यीय समितीने कृती आराखडा तयार केला आहे. राजधानीतील हवा काही प्रदूषित झाली आहे. प्रदूषित हवेच्या त्रास नागरिकांना बसू नये यासाठी भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी कॅनॉट प्लेस परिसरात दिल्लीकरांना मास्क वाटले होते.