नेहरू संग्रहालयाचं नावही बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखलं जाणार; पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 04:56 PM2022-03-29T16:56:02+5:302022-03-29T16:56:45+5:30
सर्व पंतप्रधानांच्या योगदानाची जनतेला ओळख व्हावी, यासाठी आपल्या सरकारने हा निर्णय घेतला आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत सांगितले.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नेहरू संग्रहालयाचे नाव बदलण्याचा निर्मय घेतला आहे. आता हे संग्रहालय पीएम म्युझियम नावाने ओळखले जाईल. येथे देशातील सर्व 14 माजी पंतप्रधानांच्या आठवणींचे जतन केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंबेडकर जयंतीला अर्थात 14 एप्रिलरोजी याचे उद्घाटन केले जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारतीय जनता पक्षाच्या खासदारांशी बोलताना म्हणाले, एनडीए सरकारने 14 माजी पंतप्रधानांचे योगदान स्वीकारण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान संग्रहालयात सर्व माजी पंतप्रधानांची कार्ये दर्शवण्यात आली आहेत. एवढेच नाही, तर सर्व पंतप्रधानांच्या योगदानाची जनतेला ओळख व्हावी, यासाठी आपल्या सरकारने हा निर्णय घेतला आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत सांगितले.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पीएम मोदी भाजप खासदारांसोबत बोलताना म्हणाले की, केवळ एनडीए सरकारनेच मागील पंतप्रधानांचे योगदान जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पावले उचलली आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियमला भेट देण्याचेही आवाहन केले. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त दिल्लीत 14 एप्रिलला बीआर आंबेडकर संग्रहालयाचेही उद्घाटन होणार आहे.
नवी दिल्ली येथे आंबेडकर केंद्रात झालेल्या या संसदीय पक्षाच्या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृह मंत्री अमित शाहदेखील उपस्थित होते.