स्वाती मालीवाल यांच्या आरोपानंतर ध्रुव राठीची पोस्ट, म्हणाला, "तुम्ही मला गप्प केले तर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 07:22 PM2024-05-28T19:22:37+5:302024-05-28T19:25:02+5:30
आपच्या खासदार स्वाती मालिवाल यांनी केलेल्या आरोपानंतर युट्यूबर ध्रुव राठीने प्रतिक्रिया दिली आहे.
Dhruv Rathee vs Swati Maliwal : आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावरील कथित हल्ल्याच्या प्रकरणात आता यूट्यूबर ध्रुव राठी देखील वादात सापडला आहे. स्वाती मालीवाल यांनी दावा केला की ध्रुव राठीने मारहाणीच्या घटनेबाबत एकतर्फी व्हिडिओ बनवला होता. या व्हिडीओमुळे मला बलात्कार आणि खुनाची धमकी दिली जात असल्याचे स्वाती मालिवाल यांनी म्हटलं आहे. मात्र आता ध्रुव राठीने हे आरोप फेटाळून लावत मला गप्प करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र तसे होणार नाही, असे म्हटले आहे. कोणाचेही नाव न घेता गुन्हेगार पीडित बनण्याचा प्रयत्न करत आहे, असेही ध्रुव राठी म्हणाला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार यांच्या कथित हल्ल्यावरून सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान खासदार स्वाती मालीवाल यांनी आरोप केला आहे की त्यांना आपकडून बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. यासाठी एकतर्फी व्हिडिओ पोस्ट करणारा ध्रुव राठी जबाबदार असल्याचे स्वाती मालिवाल यांनी म्हटलं आहे. स्वाती मालिवाल यांच्या आरोपानंतर ध्रुव राठीने सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिलं आहे.
याआधी स्वाती मालीवाल यांनी आरोप केला होता की आम आदमी पार्टी आणि त्यांच्या स्वयंसेवकांकडून माझ्या चारित्र्याची हत्या करण्यासाठी मोहीम चालवली जात आहे. ध्रुव राठीने त्याच्यावर एकतर्फी व्हिडिओ बनवल्याने परिस्थिती आणखीनच बिघडल्याचे मालीवाल यांचे म्हणणे आहे.'माझ्या पक्षाचे नेते आणि स्वयंसेवकांकडून चारित्र्यहनन मोहिमेनंतर मला बलात्कार आणि खुनाची धमकी दिली जात आहे. जेव्हा युट्यूबर ध्रुव राठीने माझ्यावर एकतर्फी व्हिडिओ बनवला आणि तो शेअर केला तेव्हा त्याला गती मिळाली, असे मालिवाल यांनी म्हटलं होतं.
"अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय बिभव कुमार यांच्यावर आरोप होत असल्याने आम आदमी पक्षाकडून मला धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी ध्रुव राठी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोन कॉल्सकडे दुर्लक्ष केले. स्वतःला स्वतंत्र पत्रकार म्हणवून घेणारे लोक आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्यांसारखे वागत आहेत आणि मला आता शिवीगाळ आणि धमक्यांचा सामना करावा लागत आहे, हे लाजिरवाणे आहे," असेही मालिवाल यांनी म्हटलं होतं.
या सगळ्यावर आता ध्रुव राठीने स्पष्टीकरण दिलं आहे. "माझ्यावर खोटे आरोप केले गेले जातात, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या जातात, अपमान केला जातो आणि बदनामीच्या मोहिमेला सामोरे जावे लागते. आता मला याची सवय झाली आहे. पण आता गंमत अशी आहे की, गुन्हेगार स्वतःच पीडित बनण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्यामागे कोण आहे हे सर्वांना माहीत आहे. त्यांना मला गप्प करायचे आहे. पण तसे होणार नाही. जर तुम्ही एका ध्रुव राठीला गप्प केले तर १००० नवीन तयार होतील. जय हिंद," असे ध्रुव राठीने आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.