दिल्ली दूर नहीं! ...तर स्फोटकांचीही गरज राहणार नाही!!

By गजानन दिवाण | Published: November 28, 2019 05:57 AM2019-11-28T05:57:38+5:302019-11-28T12:08:52+5:30

राजधानी परिसरात लाखो लोकांचे आयुष्य कमी होत चालले आहे. प्रदूषणाने त्यांचा जीव गुदमरत आहे. प्रदूषित पाण्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खरेतर, जगभराचाच हा प्रश्न आहे; पण तो आम्हाला किती कळला हाच मूळ प्रश्न आहे. हवामान बदल, पर्यावरण, प्रदूषण याबाबत अनेक जण बोलत असतात. प्रत्यक्ष कृती मात्र कुणीच करीत नाही.

Delhi is not far! No need for explosives !! | दिल्ली दूर नहीं! ...तर स्फोटकांचीही गरज राहणार नाही!!

दिल्ली दूर नहीं! ...तर स्फोटकांचीही गरज राहणार नाही!!

Next

- गजानन दिवाण
(उप वृत्त संपादक, लोकमत)

राजधानी परिसरात लाखो लोकांचे आयुष्य कमी होत चालले आहे. प्रदूषणाने त्यांचा जीव गुदमरत आहे. प्रदूषित पाण्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अंतर्गत युद्धापेक्षाही ही स्थिती भयंकर आहे. त्यापेक्षा या सगळ्या लोकांना स्फोटकांनी मारून तरी टाका, असा संताप सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी व्यक्त केला. प्रदूषणाचा हा प्रश्न एकट्या दिल्लीचा नाही. देशातील सर्वच शहरे कमी-अधिक प्रमाणात या युद्धजन्य परिस्थितीत जगत आहेत.

खरेतर, जगभराचाच हा प्रश्न आहे; पण तो आम्हाला किती कळला हाच मूळ प्रश्न आहे. हवामान बदल, पर्यावरण, प्रदूषण याबाबत अनेक जण बोलत असतात. प्रत्यक्ष कृती मात्र कुणीच करीत नाही. ‘आम्ही मोठे होईपर्यंत या पृथ्वीवरील सर्वच वातावरण विषारी होऊन जाणार असेल, तर शाळेत जायचेच कशाला,’ असा प्रश्न करून अनेक देशांत ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ चळवळ उभारणारी ग्रेटा थनबर्ग १६ वर्षांची असूनही आपल्यापेक्षा खूप समजदार ठरते, ती यामुळेच. ती स्वत: शाकाहारी होते. कुटुंबाला शाकाहारी करते. प्रवासाची साधने बदलते. एवढेच नव्हे, तर संयुक्त राष्टÑाच्या बैठकीला जाण्यासाठी हवाई प्रवास नाकारत शून्य कार्बन उत्सर्जन असलेल्या जहाजातून प्रवास करते, अशी ही ग्रेटा अशा अनेक कारणांमुळे आपल्यापेक्षा समजदार ठरते.

मुले आता शहाणी होत आहेत. चांगले-वाईट त्यांना कळू लागले आहे. या मुलांचे नेतृत्व ग्रेटा करते आहे. आम्ही मात्र विकासाच्या त्याच भाबड्या जगात वावरत आहोत. ‘दिल्ली’ आता कोणालाच दूर राहिलेली नाही. दिल्लीत श्वास घेणे कठीण झालेले असताना महाराष्टÑातही पाणी प्रदूषणाची स्थिती अतिशय गंभीर आहे. महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या अहवालात तापी नदी सर्वाधिक प्रदूषित झाली आहे. राज्यातील १७६ नद्या, समुद्र, धरण आदी ठिकाणी २२८ पाणी गुणवत्ता तपासणी केंद्रांच्या आणि ६६ भूजल सर्वेक्षण केंद्रांच्या माध्यमातून हा अभ्यास करण्यात आला. यात नागपूर जिल्ह्यातील बहुतेक नद्या आणि जलस्रोत प्रदूषित आढळले. गोदावरी, मुळा-मुठा, वैनगंगा, भीमा, कृष्णा, चंद्रभागा, कोयना, तानसा, पंचगंगा, इंद्रावती, पूर्णा, सूर्या आदी नद्या प्रदूषित आढळल्या. शहरांमधून बाहेर पडणारे सांडपाणी या नद्यांमध्ये मिसळते. या सांडपाण्यावर अनेक ठिकाणी प्रक्रियाच केली जात नाही. हे विषारी पाणी नदीत मिसळत असल्याने जलसाखळी अडचणीत आली असून, शेतीसह माणसाच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मोठ्या प्रमाणात होणारा वाळूचा उपसा आणि अतिक्रमण हीदेखील मोठी कारणे आहेत. प्रश्न केवळ पाण्यापुरताच नाही, तर आपली हवाही शुद्ध राहिलेली नाही.

प्रदूषणाची सर्वोच्च पातळी गाठूनही त्यावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरलेल्या १०२ शहरांना अलीकडेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने तातडीने अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्याची सूचना दिली आहे. आश्चर्य म्हणजे यात तब्बल ४३ स्मार्ट शहरे आहेत. मुंबई, नवी मुंबई, बदलापूर, उल्हासनगर, पुणे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर आणि लातूर ही महाराष्टÑातील प्रदूषित शहरे या यादीत आहेत. यातही सर्वाधिक घातक पातळी पुणे, बदलापूर, उल्हासनगर, नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूरची असून, येथे नायट्रोजन डायआॅक्साईडचे प्रमाण सर्वाधिक आहे. केंद्राच्या मानकानुसार ‘पार्टिक्युलेट मॅटर १०’चे वार्षिक सरासरी प्रमाण ६० आणि नायट्रोजन डायआॅक्साईडचे वार्षिक सरासरी प्रमाण ४० पेक्षा जास्त असल्यास या शहरास प्रदूषित शहर म्हटले जाते. महाराष्टÑातील या सर्व शहरांनी ही पातळी ओलांडली आहे. या प्रदूषणात महाराष्टÑानंतर उत्तर प्रदेश असून, या राज्यातील १५ शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत. पंजाबमधील आठ, हिमाचल प्रदेशातील सात, कर्नाटकातील चार, आंध्र प्रदेशातील पाच, गुजरातमधील सुरत आणि तामिळनाडूतील तुतिकोरीन हे शहर सर्वाधिक प्रदूषित आहे. हे प्रदूषण कधी थांबणार?

ग्रेटा म्हणते, ‘मला वर्तमानाची दररोज भीती वाटते. तुम्हालाही ती वाटली तरच तुमचे वर्तन बदलेल. घराला आग लागल्यावर आपण आटोकाट प्रयत्न करू, तसे शर्थीचे प्रयत्न तुम्ही केले पाहिजेत. कारण आपल्या घराला खरोखरीच आग लागली आहे.’ या आगीचे चटके प्रत्येकाला बसूनही आपले डोळे उघडत नसतील, तर त्याला काय म्हणायचे?

Web Title: Delhi is not far! No need for explosives !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.