दिल्ली-पाटणा फ्लाइटमध्ये दोन प्रवशांचा दारू पिऊन गोंधळ; लँड होताच दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 01:52 PM2023-01-09T13:52:00+5:302023-01-09T13:52:24+5:30
गेल्या काही दिवसात विमानात दारू पिऊन गैरवर्तन केल्याच्या घटना वाढल्या आहेत.
पाटणा- विमानात दारू पिऊन गैरवर्तन केल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आल्या आहेत. यातच, दिल्लीहून पाटण्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात दोन प्रवाशांनी दारू पिऊन गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही प्रवाशांना पाटण्यात उतरल्यानंतर विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनी दारू प्यायल्याची पुष्टी झाली असून, आजच त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. इंडिगोच्या व्यवस्थापकाने लेखी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
दिल्लीहून पाटण्याला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E-6383 मध्ये या दोन प्रवाशांनी गोंधळ घातला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडिंगपूर्वीच एअर ट्रॅफिक कंट्रोलला इंडिगोने सांगितले होते की, फ्लाइटमध्ये दोन प्रवासी दारू पिऊन गोंधळ घालत आहेत. या प्रवाशांना चालक दलातील सदस्यांनी दारू पिण्यापासून रोखलेही होते. यानंतर या लोकांनी लेखी माफीही मागितली. पण, लँडिंगनंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
यापूर्वी अनेक घटन घडल्या
विशेष म्हणजे, अशाच एका प्रकरणात दिल्ली पोलिसांनी 7 जानेवारीलाच शंकर मिश्राला अटक केली होती. शंकर मिश्रा याच्यावर 26 नोव्हेंबरला न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये एका महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याचा आरोप आहे. महिलेने तात्काळ या घटनेची तक्रार नोंदवली, पण, अनेक दिवसानंतर 7 जानेवारीला त्या व्यक्तीला अटक झाली. पॅरिसहून दिल्लीला येणा-या फ्लाईटमध्येही असेच एक प्रकरण समोर आले असून, एका व्यक्तीने महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केली. ही घटना डिसेंबर महिन्याची आहे. हवाई वाहतूक महासंचालनालयाने याप्रकरणी एअर इंडियाकडून उत्तर मागितले आहे.