जैश-ए-मोहम्मदच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 11:19 AM2019-05-14T11:19:19+5:302019-05-14T11:21:59+5:30
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला श्रीनगरमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे.
नवी दिल्ली - जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला श्रीनगरमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. अब्दुल मजीद बाबा असं दहशतवाद्याचं नाव असून त्याच्यावर तब्बल 2 लाखांचं बक्षिस होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल मजीद बाबा याला श्रीनगरमधून अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. अब्दुल हा जम्मू-काश्मीरच्या मागरेपोरा येथील रहिवासी असून त्याच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते. तो अनेक दिवसांपासून फरार होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला अब्दुलविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्याला ट्रॅक करायला सुरुवात केली.
2007 मध्ये दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. तेव्हापासून अब्दुल मजीद बाबा हा फरार होता. पोलिसांनी या चकमकीनंतर तिघांना अटक केली होती. 2015 मध्ये उच्च न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच फरार झालेल्या अब्दुल विरोधात उच्च न्यायालयाने वॉरंट जारी केलं होतं.
Abdul Majeed Baba, a Jaish-e-Mohammad terrorist with a Rs 2 lakh reward on his head, who was arrested in Srinagar, J&K on 11th May brought to Delhi on transit remand.
— ANI (@ANI) May 14, 2019
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथून काही दिवसांपूर्वी जैश-ए-मोहम्मदचा वाँटेड दहशतवादी फैय्याज अहमद लोनला अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला जैशच्या दहशतवाद्याला पकडण्यात यश आले होते. दिल्ली पोलिसांनी फैय्याज अहमद लोनवर दोन लाखांचे बक्षीस ठेवले होते. फैय्याज 2015 पासून फरार असून त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. तसेच त्याआधी काही दिवसांपूर्वीच जैश-ए-मोहम्मदचा कमांडर व पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मुदस्सीर अहमदचा साथीदार सज्जाद खानला दिल्लीतून अटक करण्यात आली होती. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा पथकं आणि तपास यंत्रणांनी जैश-ए-मोहम्मद विरोधातील आपली मोहिम अधिक तीव्र केली आहे.
Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (3 मे) चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. तर एक जवान जखमी झाला होता. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू होती. एक जवान जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले. शोपियानमधील चकमकीनंतर परिसरातील मोबाइल इंटरनेट सेवा ही काही काळासाठी बंद करण्यात आली होती.
जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा नेत्याची दहशतवाद्यांकडून हत्या; घरात घुसून झाडल्या गोळ्या
दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गुल मोहम्मद मीर यांची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केली होती. तीन दहशतवादी मीर यांच्या नौगाम वोरिनाममधील घरात घुसले होते. त्यांनी मीर यांच्याकडे त्यांच्या गाडीची चावी मागितली आणि गाडी घेऊन जाताना मीर यांच्यावर गोळ्या झाडल्या. परिसरात अटल नावानं ओळखल्या जाणाऱ्या गुल मोहम्मद मीर यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिली होती. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी नाकेबंदी करण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं. मीर यांच्या हत्येबद्दल भाजपाकडून दु:ख व्यक्त करण्यात आलं. काश्मीर खोऱ्यातली शांतता भंग करणाऱ्यांविरोधात आणि निष्पापांच्या हत्या करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली होती.
किश्तवाडमध्ये मंगळवारी (9 एप्रिल) दहशतवाद्यांनी रुग्णालयात घुसून फार्मासिस्ट आणि RSS नेत्याची हत्या केली होती. यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानावरही गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गंभीर जखमी असलेल्या आरएसएस नेत्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र आरएसएस नेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पीएसओ जवान या गोळीबारात शहीद झाला आहे. मंगळवारी दुपारी किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांनी घुसून फार्मासिस्ट व आरएसएस नेते चंद्रकांत शर्मा आणि त्यांचे पीएसओ यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. पीएसओ जवान घटनास्थळीच शहीद झाला. RSS नेत्याला एअरलिफ्ट करून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज(जीएमसी)मध्ये आणण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.