लाल किल्ला हिंसाचाराप्रकरणी आणखी दोघांना अटक; कटाचे सूत्रधार असल्याचा आरोप
By देवेश फडके | Published: February 23, 2021 11:35 AM2021-02-23T11:35:21+5:302021-02-23T11:39:21+5:30
केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन अद्यापही सुरूच आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार उसळला. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आणखी दोन जणांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन अद्यापही सुरूच आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार उसळला. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आणखी दोन जणांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. (delhi police arrested two accused from jammu in red fort riot)
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराप्रकरणी विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. जम्मू येथे केलेल्या कारवाईदरम्यान दोन जणांना अटक केल्याची माहिती मिळाली आहे. मोहिंदर सिंग आणि मनदीप सिंग अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून, ते जम्मूचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
‘रंग दे बसंती’च्या अभिनेत्याचा निर्मला सीतारामन यांना टोला; म्हणाला, हा तर ढोंगीपणा
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराप्रकरणी या दोघांची भूमिका महत्त्वाची होती. लाल किल्ला हिंसाचाराच्या कटाचे ते सूत्रधार होते, असा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या दोघांना आता न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मोहिंदर सिंग यांच्या पत्नीने ते निर्दोष असल्याचा दावा केला आहे. जम्मू पोलिसांच्या वरिष्ठ अधीक्षकांनी बोलावले आहे, असे सांगून मोहिंद सिंग गेले. त्यानंतर त्यांचा फोन बंद येऊ लागला. चौकशी केल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली असून, दिल्लीला घेऊन गेल्याची माहिती मिळाली. लाल किल्ल्यावर हिंसाचार झाला, तेव्हा ते भारतीय सीमेवर होते. मोहिंदर सिंग यांनी काही चुकीचे केले नाही, असा दावा त्यांच्या पत्नीने केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी लाल किल्ल्यावर तलवार घेऊन हिंसाचारात सामील झालेल्या एकाला अटक करण्यात आली होती. २९ वर्षीय जसप्रीत सिंग नामक व्यक्तीकडून तलवारही जप्त करण्यात आली होती. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी दीप सिद्धू आणि इक्बाल सिंग यांनाही यापूर्वी दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. गुप्तचर विभाग आणि गुन्हे शाखेकडून त्यांची कसून चौकशी केली जात असून, खलिस्तान्यांशी असलेला संबंध समोर येत असल्याचे सांगितले जात आहे.