पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ, दिल्ली पोलिसांनी दाखल केला फसवणुकीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 08:08 PM2024-07-19T20:08:20+5:302024-07-19T20:10:43+5:30
Pooja Khedkar : याआधी यूपीएससीने पूजा खेडकर विरोधात एफआयआर दाखल केला आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) केलेल्या तक्रारीनंतर दिल्लीपोलिसांच्या क्राइम ब्रँचने प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात फसवणूक आणि दिव्यांगत्वाच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
याआधी यूपीएससीने पूजा खेडकर विरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसेच युपीएससीने पूजा खेडकर यांना नोटीस बजावून कागदपत्रांच्या अनियमिततेबाबत उत्तर मागितले आहे. तुमची उमेदवारी रद्द का करू नये, अशी विचारणा देखील यूपीएससीने पूजा खेडकर यांना केली आहे. तसेच, यूपीएससीने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्याबाबत नोटीस जारी केली आहे.
यासोबत पूजा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रे निर्माण करून विहित मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षा दिली, जे नियमांच्या विरोधात असल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. तसेच खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे.
दरम्यान, आयएएस अधिकारी बनण्यासाठी पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. कोट्यवधींची संपत्ती नावावर असताना ओबीसी नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेटही पूजा खेडकर यांनी काढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कार्मिक मंत्रालयाने एक समिती नेमली असून दोन आठवड्यात त्याचा अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यासोबत पूजा खेडकर यांचे कुटुंबीयही या वादात सापडले आहेत. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी काल अटक केली. त्यानंतर कोर्टात हजर करण्यात आले असाता मनोरमा खेडकरांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आली आहे.
पुणे पोलिसांची दुसरी नोटीस
वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी दुसरी नोटीस दिली आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात छळवणुकीचा आरोप पूजा खेडकरांनी केला आहे. या आरोपांसदर्भात ही नोटीस देण्यात आली आहे. वाशिम पोलिसांच्या एपीआय श्रीदेवी पाटलांनी वाशिम विश्रामगृहावर जाऊन खेडकरांना नोटीस दिली. पूजा खेडकर यांना याआधी नोटीस देऊनही त्या चौकशीसाठी गैरहजर राहिल्या होत्या. त्यामुळं आज दुसरी नोटीस देण्यात आली आहे.