महुआ मोईत्रांच्या अडचणीत वाढ! दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 06:56 PM2024-07-07T18:56:46+5:302024-07-07T19:47:44+5:30
Mahua Moitra : महिला आयोगाने शुक्रवारी (५ जुलै) दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती.
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बीएनएसच्या कलम ७९ अंतर्गत, म्हणजेच महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महुआ मोइत्रा यांनी सोशल मीडिया साइटवर एका पोस्टमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी महिला आयोगाने शुक्रवारी (५ जुलै) दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रविवारी (७ जुलै) गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे इंटेलिजेंस फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) युनिट आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स हँडलवरून माहिती घेईल, ज्यावरून रेखा शर्मा यांच्याविरोधात अपशब्द वापरण्यात आले होते.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे २ जुलै रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा ३ जुलै रोजी घटनास्थळी गेल्या होत्या. या विषयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला. त्यात एक व्यक्ती रेखा शर्मा यांच्या डोक्यावर छत्री धरुन उभा होता. तो व्हिडिओवर सोशल मीडियावर पाहिल्यानंतर रेखा शर्मा यांना छत्री सुद्धा हातात धरता येत नाही का? असा सवाल एका युजर्सने केला होता. त्यावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही अभ्रद टिप्पणी दिली.
काय म्हणाल्या होत्या महुआ मोईत्रा?
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा म्हणाल्या की, त्या (रेखा शर्मा) आपल्या बॉसचा पायजमा पकडण्यात गुंतलेल्या आहेत, अशी टिप्पणी केली. त्यानंतर वाद उफळला. ही टिप्पणी अत्यंत अपमानजनक असल्याचे सांगत राष्ट्रीय महिला आयोगाने दिल्ली पोलिसांत तक्रार दिली. तसेच, महुआ मोईत्रा यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिताच्या कलम ७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आले.