दिल्ली पोलिसांना झटका, कन्हैया कुमारला जामीन मंजूर
By admin | Published: March 2, 2016 06:57 PM2016-03-02T18:57:35+5:302016-03-02T19:11:17+5:30
देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कन्हैया कुमारला जामीन मंजूर केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - जवाहरलाल नेहरु विद्यापीठात देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कन्हैया कुमारला दिल्ली उच्च न्यायालयाने सहा महिन्यांसाठी हंगामी जामीन मंजूर केला आहे. कन्हैया कुमारला जामीन मंजूर होणे हा दिल्ली पोलिसांसाठी एक झटका आहे. कन्हैया कुमारला १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर झाला असून, दिल्ली पोलिसांनी त्याला चौकशीत सहकार्य करण्यास सांगितलं आहे.
मंगळवारी झालेल्या सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने कन्हैयाच्या जामिनावर निर्णय राखून ठेवला होता. काल झालेल्या सुनावणीत दिल्ली पोलिसांनी कन्हैया विरोधात देशविरोधी घोषणा दिल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याची कबुली न्यायालयासमोर दिली होती. त्यावेळी न्यायालायने दिल्ली पोलिसांना तुम्हाला देशद्रोहाच्या आरोपाचा अर्थ कळतो का ? असा प्रश्न विचारला होता.
दोन आठवडयापूर्वी दिल्ली पोलिसांनी कन्हैयाला देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. कन्हैया जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा नेता आहे. पतियाळा हाऊस कोर्टात झालेल्या सुनावणीत कन्हैयाला मारहाणही झाली होती. त्यावेळी त्याने जिवीताला धोका असल्याने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती.
पण सर्वोच्च न्यायालयाने त्याला दिल्ली उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले होते. दोन आठवडयांमध्ये दिल्ली पोलिसांना कन्हैयावर देशद्रोहाचा आरोप सिद्ध होईल असा कोणताही पुरावा मिळाला नाही. कन्हैयाच्या जामिनाचे सोपस्कर पूर्ण होऊन तो उद्यापर्यंत बाहेर येण्याची शक्यता आहे.
#flash Kanhaiya Kumar granted interim bail for 6 months by Delhi High Court. #JNURow
— ANI (@ANI_news) March 2, 2016