हॅलो! नोकरी करायची आहे का?...; होकार देताच हजारो लोकांची झाली फसवणूक, 4 जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 06:17 PM2022-09-26T18:17:35+5:302022-09-26T18:18:20+5:30
दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बरेली येथून फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे.
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनीउत्तर प्रदेशातील बरेली येथून फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. बनावट कॉल सेंटरद्वारे हजारहून अधिक लोकांची नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर होता. या 4 जणांनी नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच आरोपींवर कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय प्रांशु, 20 वर्षीय हिमांशू, 27 वर्षीय पंकज पांडे आणि 28 वर्षीय दीपक कुमार अशी 4 आरोपींची नावे आहेत. प्रांशु आणि हिमांशू हे उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत, तर पंकज फरीदाबादचा आणि दीपक बदरपूरचा रहिवासी आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेच्या आरोपांनुसार काही लोकांनी नोकरी देण्याच्या नावाखाली 2,76,072 लाख रुपयांची फसवणूक केली. या तक्रारदाराने नोकरीसाठी अर्ज केला होता आणि कंपनीच्या एचआर विभागात व्यवस्थापक पदासाठी तीन नंबरवरून नोकरीची ऑफर देण्यात आली होती.
आरोपींच्या बॅंक खात्यातून मिळाली माहिती
पोलिसांनी सांगितले की, पैसे भरल्यानंतर संबंधित कंपनीच्या लेटरहेडवर तक्रारदार तरुणीला बनावट नियुक्ती प्रमाणपत्र पाठवण्यात आले. तसेच तपासादरम्यान असेही आढळून आले की, बरेली येथून बनावट कॉल सेंटर चालवले जात आहे. आरोपींच्या बँक खात्याचे डिटेल्स आणि कॉल डिटेल रेकॉर्डवरून असे दिसून आले आहे की त्यांनी अनेक लोकांची फसवणूक केली आहे.
बरेलीतून आरोपींना अटक
पोलीस उपायुक्त चंदन चौधरी यांनी म्हटले, पोलिसांचे एक दल बरेलीतील बसंत विहार येथे गेले आणि तिथे छापा मारून चार आरोपींना पकडण्यात आले. चौकशीतून आरोपींनी विविध कंपन्यांमध्ये नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देऊन हजाराहून अधिक लोकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.