Shraddha Murder Case: आफताबने हातोड्याने श्रद्धाच्या डोक्याचे तुकडे केले का? दिल्ली पोलिसांचा नव्या अँगलने तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 08:29 PM2022-12-06T20:29:11+5:302022-12-06T20:30:21+5:30
Shraddha Murder Case: श्रद्धाच्या हत्येप्रकरणात पोलिसांना महत्त्वाची कागदपत्रे सापडली असून, विविध अँगलने पोलिसांचा कसून तपास सुरू आहे.
Shraddha Walker Murder Case:श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. प्रियकर आफताब पूनवालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. तसेच हे तुकडे एक एक करत दिल्लीतील मेहरोली परिसरात असलेल्या जंगलात फेकण्यात आले होते. या प्रकरणी दररोज नवनवीत खुलासे होत असून, पोलीसही चक्रावून गेले आहेत. तर नव्या गोष्टींमुळे देशवासीही सुन्न होत आहे. यातच आता आफताबने विकत घेतलेल्या दोन हातोड्यांचे काय केले, त्यानेच तर श्रद्धाच्या डोक्याचे तुकडे केले गेले का, यासंदर्भात दिल्ली पोलीस कामाला लागले आहेत.
आफताबला अटक करून २३ दिवस झाले असले तरी दिल्ली पोलिसांच्या हाती अद्याप ठोस पुरावे लागलेले नाहीत. आरोपी आफताबची पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी पूर्ण झाली आहे. तरीही पोलीस ठोस काहीतरी मिळण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. आफताबने विकत घेतलेल्या दोन हातोड्यांनी श्रद्धाच्या डोक्याचे तुकडे केले आणि नंतर लहान करवतीने मृतदेहाचे तुकडे केले का, या अँगलने आता पोलीस पुढे तपास करत असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे पोलिसांना अद्यापही श्रद्धाचे शीर सापडलेले नाही.
श्रद्धा आणि आफताबच्या सोशल मीडियाचाही कसून तपास
दिल्लीबाहेर येण्या-जाण्यासंदर्भात काही कागदपत्रे सापडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आफताब आणि श्रद्धा यांच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंट्सचीही छाननी केली जात आहे. मैदान गढीच्या तलावात शोधमोहीम थांबवण्यात आली आहे. गरज पडल्यास आणखी शोध घेणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आफताबची न्यायालयीन कोठडी दोन दिवसांनी पूर्ण होत आहे. ०८ डिसेंबर रोजी पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आफताबला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. यासोबतच या प्रकरणाशी संबंधित अपडेटही न्यायालयासमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, आफताबची इंटरनेट सर्च हिस्ट्री तपासल्यावर असे आढळून आले आहे की, श्रद्धाच्या हत्येनंतर जून महिन्यात लढलेली जगातील सर्वात महागडी केस आफताबने अनेकवेळा पाहिली आणि वाचली होती. या प्रकरणातून कायद्याच्या सर्व युक्त्या मी समजावून घेतल्या होत्या, असे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"