स्वातंत्र्यदिनावर दहशतवादाचं सावट, देशभरात कडेकोट सुरक्षा; मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचे लावले पोस्टर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 06:34 PM2021-08-07T18:34:43+5:302021-08-07T18:39:15+5:30
delhi police pasted posters of 6 most wanted terrorists near red fort ahead of independence day : दिल्ली पोलिसांकडून या सहा व्यक्तींपैकी कोणतीही व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांना संपर्क साधण्याचं, माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली - स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीपासून ते काश्मीरपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 15 ऑगस्टच्या कार्यक्रमांवर दहशतवादाचं सावट दिसून येतं आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ मोठ्या संख्येत सुरक्षादलांना तैनात करण्यात आलं आहे. याच दरम्यान दिल्ली पोलिसांकडून लाल किल्ल्याजवळ मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचे फोटो असलेले पोस्टर्स चिटकवण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये सहा दहशतवाद्यांचे फोटो देण्यात आले असून यामध्ये त्यांचं नाव आणि पत्ताही नमूद करण्यात आला आहे.
दिल्ली पोलिसांकडून या सहा व्यक्तींपैकी कोणतीही व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांना संपर्क साधण्याचं आणि माहिती देण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. पोस्टर्सवर असलेले हे सहा दहशतवादी 'अल कायदा' या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणणं त्यांचा उद्देश असल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हे दहशतवादी फक्त दिल्लीच नाही तर देशातील कोणत्याही भागात दहशतवादी कारवाया घडवून आणू शकतात.
Jammu And Kashmir : सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच #JammuAndKashmir#terrorist#terrorismhttps://t.co/tws9SMxf6D
— Lokmat (@MiLOKMAT) August 7, 2021
दहशतवाद्यांचा उद्देश केवळ शांती भंग करणं आणि नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण तयार करणं, हेच आहे. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी पोस्टर्स जाहीर करण्याचा निर्णय घेतला. तसेच शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली काही लोकांकडून दिल्लीत दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. दहशतवादी संघटनांकडून यासाठी ड्रोनचा देखील वापर केला जाऊ शकतो, असं म्हणत दिल्ली पोलीस आयुक्तांनी ड्रोन उडवण्यावर बंदी घातली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सैन्याला मोठं यश! बडगाम चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. तसेच जवानांनी एक AK-47 आणि पिस्तूल देखील जप्त केली आहे. याचबरोबर संबंधित परिसरात जवांनाकडून शोधमोहीम राबवली जात असल्याची देखील माहिती समोर आली आहे. शुक्रवारी जम्मूतील राजौरीमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं होतं. दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.