'ट्रॅक्टर रॅली'साठी दिल्ली पोलिसांची परवानगी; सिंघु, टिकरी व गाझीपूर बॉर्डरवरून शेतकरी करणार एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 08:10 PM2021-01-24T20:10:15+5:302021-01-24T20:27:06+5:30
ट्रॅक्टर रॅलीसाठी शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांना लिखित परवानगी मागितली होती.
नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन आज ६० व्या दिवशीही सुरूच आहे. याच आंदोलनातंर्गत शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला म्हणजेच 'प्रजासत्ताक दिनी' ट्रॅक्टर रॅली काढून आपला निषेध नोंदविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यासाठी शेतकरी संघटनांकडून तीन सीमांची (बॉर्डर) निश्चिती करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या या ट्रॅक्टर रॅलीसाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅलीसाठी दिल्लीतील ३ ठिकाणी (सिंघु बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डर) बॅरिकेट्स काढून काही किलोमीटरच्या आत येण्यास परवानगी देण्यात येणार आहे. दरम्यान, या ट्रॅक्टर रॅलीसाठी शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांना लिखित परवानगी मागितली होती.
"आज शेतकर्यांसोबत चांगली चर्चा झाली. संपूर्ण सन्माने ट्रॅक्टर रॅली करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर या तिन्ही ठिकाणांतील शेतकरी ट्रॅक्टर रॅलीसाठी प्रवेश करू शकतील", असे दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी सांगितले.
याचबरोबर, शेतकऱ्यांच्या टॅक्टर रॅलीसाठी टिकरी बॉर्डवर ७ ते ८ हजार ट्रॅक्टर दाखल झाले आहेत, तर गाझीपूर बॉर्डवर १ हजार आणि सिंघू बॉर्डरवर 5 हजार ट्रॅक्टर पोहोचले आहेत. त्यामुळे सुरक्षितरित्या ट्रॅक्टर रॅली यशस्वी व्हावी, यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, असेही दीपेंद्र पाठक म्हणाले.
The tractor rally will enter Delhi from Tikri, Singhu & Ghazipur borders & return to its originating points. From Singhu, it will pass through Kanjhawala, Bawana, Auchandi border, KMP Expressway & then return to Singhu:Dependra Pathak, Special CP, Intelligence, Delhi Police (1/2) https://t.co/SAgWiDXC4g
— ANI (@ANI) January 24, 2021
अशी निघणार ट्रॅक्टर रॅली...
सिंघु बॉर्डर: सिंघु सीमेवरून निघालेली ट्रॅक्टर रॅली संजय गांधी ट्रान्सपोर्ट, कंझावला, बवाा, औचंदी बॉर्डरवरून हरियाणासाठी रवाना होईल.
टिकरी बॉर्डर : टिकरी बॉर्डरवरून निघालेली ट्रॅक्टर रॅली नागलोई, नजफगढ, ढांसा, बादली या मार्गावरून केएमपी एक्सप्रेसवर जाईल.
गाझीपूर यूपी गेट : ट्रॅक्टर रॅली गाझीपूर यूपी गेटहून अप्सरा बॉर्डर गाझियाबादमार्गे डासना यूपीमध्ये जाईल.