दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्यासमोर उभे केले मोठे कंटेनर्स, जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 05:54 PM2021-08-08T17:54:13+5:302021-08-08T17:55:42+5:30
Independence day delhi alert: 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा संस्थांनी याआधीच अलर्ट जारी केला आहे.
नवी दिल्ली: भारताचा स्वातंत्र्यदिन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्यासमोर पहिल्यांदाच मोठ-मोठे कंटेनर उभे केले आहेत. कंटेनर ठेवल्यामुळे लाल किल्ल्याचा समोरील भाग स्पष्टपणे दिसत नाहीये. या कंटेनर्सवर 15 ऑगस्टपूर्वी पेंटिंग आणि सीनरी लावली जाणार आहे.
पोलिसांच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, 15 ऑगस्टला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हे कंटेनर्स लावण्यात आले आहेत. तसेच, 10 ऑगस्टपूर्वी अँटी ड्रोन रडार सिस्टीमही लावली जाणार आहे. ही सिस्टीम परिसरातील इतर ड्रोन्सला शोधून निकामी करण्यास सक्षम आहे. या सिस्टीमची रेंज 5 किलोमीटरची आहे. म्हणजे, लाल किल्ल्याच्या 5 किलोमीटर क्षेत्रात आलेला कुठलाही ड्रोन आपोआप निकामी होईल.
ऑलिम्पिक खेळाडूंना आमंत्रण
मिळालेल्या माहितीनुसार, यावरषी भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनी भारताकडून ऑलिम्पिकमध्ये गेलेले सर्व खेळाडून प्रमुख अतिथी असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना आमंत्रण दिलं आहे. यामुळे सुरक्षा एजंसीने त्यांच्यासाठी विशेष कॉरिडोअर बनवला आहे. त्यांची बसण्याची जागाही इतर पाहुण्यांपासून लांब असेल.
अलकायदाकडून विमानतळ उडवण्याची धमकी
दहशतवादी संघटना अलकायदाने दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGI Airport) उडवण्याची धमकी दिली आहे. दिल्ली पोलिसांना शनिवारी सायंकाळी अलकायदाच्या नावे ईमेल आला होता. यात येत्या काही दिवसात आयजीआय एअरपोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी मिळताच दिल्लीत अलर्ट जारी करण्यात आला असून, दिल्ली विमानतळावरही सुरक्षा वाढवली आहे.