दिल्लीजवळच्या घनदाट जंगलात 'अल कायदा'च्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण; पोलिसांनी केली ६ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 06:05 PM2024-08-22T18:05:36+5:302024-08-22T18:06:07+5:30

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दहशतवादी संघटनेशी संबधित सहा जणांना राजस्थानच्या जंगलातून अटक केली आहे.

Delhi Police Special Cell arrested six persons related to Al Qaeda Linked organization from the forests of Rajasthan | दिल्लीजवळच्या घनदाट जंगलात 'अल कायदा'च्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण; पोलिसांनी केली ६ जणांना अटक

दिल्लीजवळच्या घनदाट जंगलात 'अल कायदा'च्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण; पोलिसांनी केली ६ जणांना अटक

Al Qaeda Linked Hideouts In Bhiwadi : दिल्लीपोलिसांच्या स्पेशल सेलने दहशतवादी संघटना अल कायदाशी संबंध असलेल्या संशयितांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. राजस्थानमधील भिवाडी येथे ही दिल्लीपोलिसांकडून कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर स्वतंत्र दहशतवादी गट तयार करून लोकांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलीस या सहा जणांना सोबत घेऊन गेली आहे. छापेमारीनंतर अल कायदाचे मॉड्यूल उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. भिवाडीमध्ये पकडलेल्या संशयितांच्या माहितीच्या आधारे  दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्येही छापे टाकले.

दिल्ली पोलिसांनी राजस्थानच्या भिवडीतील चोपंकी परिसरात हा छापा टाकला होता. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला चोपंकी येथे अल कायदाशी संबंधित लोक असल्याची माहिती मिळाली होती. या पथकाने भिवडीतील घनदाट जंगलात शोधमोहीम राबवली. यावेळी आसपासच्या लोकांना याची माहिती न देता दूर ठेवण्यात आले होते. या कारवाईमध्ये अल कायदाद्वारे प्रेरित मॉड्यूल समोर आले. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत तीन राज्यांतून एकूण १४ संशयितांना अटक केली आहे.

शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या संशयित दहशतवाद्यांना घटनास्थळावरून पकडण्यात आले आहे. प्राथमिक तपासातून अल कायदाच्या या मॉड्यूलने भिवाडी येथे आपले प्रशिक्षण केंद्र उघडले होते. अल कायदामध्ये सहभागी असलेल्या मुलांना येथे आणून शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. पोलिसांनी अद्याप अटक करण्यात आलेल्यांची ओळख उघड केलेली नाही.

दिल्ली पोलिसांनी ज्या ठिकाणाहून संशयितांना पकडलं तो भाग डोंगराळ आणि अतिशय घनदाट जंगलाचा आहे. मोठ्या प्रमाणात जंगल असल्यामुळे सामान्यांचे तिथे येणे जाणे नव्हते. हा परिसर हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीच्या सीमांना लागून आहे. या भागांतून गोहत्येसह अवैध धंदे सुरू असल्याची माहिती पोलिसांना अनेकवेळा मिळत होती. मात्र यावेळी पहिल्यांदाच दहशतवादी कारवायांची माहिती पोलिसांना मिळाली. अटक करण्यात आलेल्या संशयितांची चौकशी करून संपूर्ण कटाची माहिती घेण्यात दिल्ली पोलीस सध्या व्यस्त आहे. इथे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवण्यात आली होती याचाही शोध घेतला जात आहे.

दरम्यान, झारखंड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधून १४ जणांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्यांचाही अल कायदाच्या दहशतवादी मॉड्यूलशी संबंध असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे राज्यांच्या पोलिस दलांच्या सहकार्याने कारवाई करण्यात आली. या मॉड्यूलचे नेतृत्व रांची येथील डॉ इश्तियाक नावाच्या व्यक्तीने केले होते. देशात खिलाफत घोषित करून गंभीर दहशतवादी कारवाया करण्याचा त्यांचा हेतू होता.
 

Web Title: Delhi Police Special Cell arrested six persons related to Al Qaeda Linked organization from the forests of Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.