पुणे ISIS मॉड्यूलच्या वॉन्टेड सदस्याला दिल्लीत अटक; डोक्यावर होते तीन लाखांचे बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 10:39 AM2024-08-09T10:39:34+5:302024-08-09T10:54:16+5:30
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रिझवान अब्दुल याला अटक केली आहे.
Pune ISIS Module Case : मुंबई-पुण्यासह गुजरातमधील महत्वाच्या शहरात बाँम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत असलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांना काही महिन्यांपूर्वी पुण्यातून अटक करण्यात आली होती. पुण्यातील कोंढव्यातील एका इमारतीमध्ये या दहशतवाद्यांनी बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे समोर आलं होतं. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने तपास करत काही जणांना अटक केली. आता या प्रकरणाचे धागेदोरे दिल्लीपर्यंत गेल्याचे समोर आलं आहे. दिल्लीत या प्रकरणाशी संबधित महत्त्वाच्या आरोपीला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शुक्रवारी सकाळी पुणे आयसिस मॉड्यूलचा महत्त्वाचा सदस्य रिझवान अब्दुल हाजी अली याला अटक केली. अलीवर तीन लाख रुपयांचे बक्षीस होते. रिझवान अली हा या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. अलीच्या अटकेसाठी अलीच्या अटकेसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वॉरंट जारी केले होते. पुणे पोलिसांच्या तावडीतून पळाल्यानतंर तो पकडले जाऊ नये म्हणून प्रयत्न करत होता. मात्र अखेर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली.
दिल्लीतील दर्यागंज येथील रहिवासी असलेल्या अलीने पुणे आयसिस मॉड्यूलच्या इतर सदस्यांसह दिल्ली आणि मुंबईतील अनेक हाय-प्रोफाइल आणि महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती गोळा केली होती. पोलिसांनी अलीच्या ताब्यातून काही शस्त्रे देखील जप्त केली आहेत. पुणे आयसिस मॉड्यूलच्या अनेक सदस्यांना पुणे पोलीस आणि एनआयएने यापूर्वीच अटक केली आहे.
पुणे आयसिस मॉड्यूल काय आहे?
राष्ट्रीय तपास यंत्रणेने जुलै २०२३ मध्ये पुण्यात शस्त्रे, स्फोटके, रसायने आणि आयसिसशी संबंधित साहित्य बाळगल्याप्रकरणी एकूण ११ जणांवर आरोपी ठरवलं होतं. मार्चमध्ये एनआयएने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात रिझवान अलीसह अन्य तीन आरोपींची नावे होती. यातील सर्व आरोपी हे दहशतवादी संघटना आयसिसशीचे सदस्य होते. दहशतवादी कारवांच्या पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी त्यांनी मोठा कट रचला होता.
हे आरोपी सिक्रेट कम्युनिकेशन ॲप्सद्वारे त्यांच्या परदेशातील हँडलरच्या संपर्कात असल्याचेही तपासात समोर आलं आहे. आरोपी हे सशस्त्र दरोडे आणि चोरी करून दहशतवादी कारवाईसाठी निधी गोळा करत होते. पुण्याच्या कोंढवा परिसरातील एका इमारतीमध्ये आरोपींनी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देखील घेतलं होतं.