जैश-ए-मोहम्मदच्या वाँटेड दहशतवाद्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 10:41 AM2019-07-16T10:41:04+5:302019-07-16T10:47:28+5:30
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या वाँटेड दहशतवाद्याला श्रीनगरमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नवी दिल्ली - जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या वाँटेड दहशतवाद्याला श्रीनगरमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दिल्लीपोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. बसीर अहमद असं दहशतवाद्याचं नाव असून त्याच्यावर तब्बल 2 लाखांचं बक्षिस होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, बसीर अहमद याला श्रीनगरमधून अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. बसीरवर दोन लाखांचे बक्षीस होते. तो अनेक दिवसांपासून फरार होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला त्याच्या विषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्याला ट्रॅक करायला सुरुवात केली.
2007 मध्ये दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. पोलिसांनी या चकमकीनंतर तिघांना अटक केली होती. त्यामध्ये बसीरचाही समावेश होता. मात्र त्याला जामीन मिळाला होता. 2015 मध्ये उच्च न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पण बसीर तेव्हापासून फरार होता. याआधी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्याचे साथीदार फैयाज आणि मजीद बाबाला अटक केली होती.
Delhi Police Special Cell has arrested JeM terrorist Basir Ahmad from Jammu & Kashmir's Srinagar. Police has announced a reward of Rs 2 lakh on his arrest. pic.twitter.com/IFbaJaGnew
— ANI (@ANI) July 16, 2019
अब्दुल मजीद बाबा या दहशतवाद्याला श्रीनगरमधून अटक करण्यात दिल्ली पोलिसांना याआधी यश आले होते. अब्दुल हा जम्मू-काश्मीरच्या मागरेपोरा येथील रहिवासी असून त्याच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते. तसेच जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथून काही दिवसांपूर्वी जैश-ए-मोहम्मदचा वाँटेड दहशतवादी फैय्याज अहमद लोनला अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला जैशच्या दहशतवाद्याला पकडण्यात यश आले होते. दिल्ली पोलिसांनी फैय्याज अहमद लोनवर दोन लाखांचे बक्षीस ठेवले होते. फैय्याज 2015 पासून फरार असून त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. तसेच त्याआधी काही दिवसांपूर्वीच जैश-ए-मोहम्मदचा कमांडर व पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मुदस्सीर अहमदचा साथीदार सज्जाद खानला दिल्लीतून अटक करण्यात आली होती. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा पथकं आणि तपास यंत्रणांनी जैश-ए-मोहम्मद विरोधातील आपली मोहिम अधिक तीव्र केली आहे.
Jammu And Kashmir : बडगाम चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा
जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी (30 जून) चकमक झाली होती. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू होती. सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये बडगाम जिल्ह्यात चकमक सुरू झाली होती. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते.