उमर खालिद हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 11:13 AM2018-08-20T11:13:49+5:302018-08-20T12:32:56+5:30
राजधानी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद याच्यावरील हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन युवकांना ताब्यात घेतले आहे.
नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद याच्यावरील हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन युवकांना ताब्यात घेतले आहे. पोलीस या दोघांची हल्ल्याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. 13 ऑगस्टला नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी उमर खालिद हजर राहिला होता. यावेळी उमरवर दोन अज्ञातांकडून गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
कॉन्स्टिट्युशन क्लब जवळच्या चहाच्या स्टॉलवर उमर खालिद आपल्या काही साथीदारांसोबत उभा होता. इतक्यात, पांढरा शर्ट घातलेली एक अज्ञात व्यक्ती त्याच्या दिशेनं आला. त्या माणसानं त्याला ढकललं आणि त्याच्यावर गोळी झाडली. पण, खालिदचा तोल गेल्यानं तो खाली पडला आणि थोडक्यात बचावला. यावेळी घटनास्थळी हजर असलेल्यांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला पण हवेत गोळ्या झाडत तो निसटला. त्यावेळी त्याच्या हातातून पिस्तुलही खाली पडली.
#Correction: Delhi Police Special Cell has detained* 2 people in connection with attack on JNU student Umar Khalid by an unidentified gunman outside Delhi's Constitution Club on Aug 13. A video had gone viral in which they had claimed responsibility for the attack: Sources https://t.co/o1VZ4XO2Ho
— ANI (@ANI) August 20, 2018
दरम्यान, उमर खालिदवर हल्ला करणारा संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विठ्ठलभाई पटेल रोडवरील सीसीटीव्हीमध्ये धावत असतानाचे हल्लेखोराचे छायाचित्र जारी करण्यात आले आहे. या छायाचित्राच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. ज्यामध्ये दोन जणांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं या दोघांना ताब्यात घेतले.
हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत या दोघांनी पंजाबमधील एका गावात आत्मसमर्पण करणार असल्याचं सांगितले होते. मात्र या दोघांनी आत्मसमर्पण केले नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली. नवीन दलाल आणि दरवेश शाहपूर अशी या दोन युवकांची नावं आहेत. 15 ऑगस्टच्या दिवशी दुपारच्या सुमारास हा व्हिडीओ दोघांनी शेअर केला होता.