तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 05:02 PM2024-04-29T17:02:00+5:302024-04-29T17:06:46+5:30
Revanth Reddy Summoned by Delhi Police: दिल्ली पोलिसांनी CM रेवंथ रेड्डींना समन्स का बजावले, वाचा सविस्तर
Revanth Reddy Summoned by Delhi Police: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी दिल्लीपोलिसांनी FIR नोंदवला आहे. दिल्लीपोलिसांनी याप्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना नोटीस बजावली आहे. सोमवारी (29 एप्रिल) पोलिसांनी अमित शाह यांचा बनावट व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी रेड्डी यांना नोटीस बजावली आणि 1 मे रोजी त्यांची बाजू मांडण्यास सांगितले. दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना दिल्लीला चौकशीसाठी बोलावले असून त्यांचा फोनही सोबत घेऊन येण्यास सांगितले आहे.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड्डी यांच्या फोनची तपासणी केली जाणार आहे. रेवंत रेड्डी यांनी अमित शाह यांचा फेक व्हिडीओ त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर केला होता. हा व्हिडिओ तेलंगणा काँग्रेसच्या अधिकृत अकाऊंटसह पक्षाच्या अनेक नेत्यांनीही रिशेअर केला. त्यानंतर तो बराच व्हायरल झाला. त्यानंतर भाजपाकडून रेड्डी आणि काँग्रेसवर बरीच टीका झाली.
एडिटेड व्हिडिओमध्ये केंद्रीय गृहमंत्री SC-ST आणि OBC समाजाचे आरक्षण रद्द करण्याबाबत बोलताना दिसत होते. पण PTI च्या फॅक्ट चेकमध्ये मात्र, अमित शाह यांनी कर्नाटकातील मुस्लिमांना दिलेले आरक्षण संपवण्याबाबत बोलल्याचा तो व्हिडीओ असल्याचे समोर आले. त्यानंतर भाजपाने रेवंथ रेड्डी आणि त्यांच्यासारख्याच इतर पोस्ट शेअर करणाऱ्यांवर टीका केली.
रविवारी (२८ एप्रिल) दिल्ली पोलिसांनी अमित शाह यांचा ए़डिटेड व्हिडिओ पोस्ट करून व्हायरल केल्याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली. भाजप आणि गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही इशारा दिला होता की, हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या सर्वांविरुद्ध कायदेशीर कारवाई होईल.
पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये अमित शाह यांचा एडिटेड व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या सर्व लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भादंविच्या कलम १५३/१५३ए/४६५/४६९/१७१जी आणि आयटी कायद्याच्या कलम ६६सी अंतर्गत FIR नोंदवण्यात आला आहे.