ब्रिजभूषण यांच्याविरोधात अद्याप तपास सुरूच; पुरावे नसल्याचे वृत्त चुकीचे - दिल्ली पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 04:00 PM2023-05-31T16:00:03+5:302023-05-31T16:01:22+5:30
विशेष म्हणजे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेवर कुस्तीपटू ठाम आहेत.
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात तपासात पुरेसे पुरावे नसल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने आणि काही मीडियाने दिले होते. मात्र, आता या वृत्ताचे दिल्लीपोलिसांनी खंडन केले आहे.
एका अधिकृत निवेदनात दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्या सुमन नलवा यांनी सांगितले की, अनेक मीडिया चॅनेल्स बातम्या चालवत आहेत की, भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये दिल्ली पोलिसांना पुरेसे पुरावे सापडले नाहीत आणि या प्रकरणाचा अंतिम अहवाल संबंधित न्यायालयासमोर सादर करावा लागेल. मात्र हे वृत्त चुकीचे असून या प्रकरणाची संपूर्ण खोल/संवेदनशीलतेने चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, याआधी एएनआय वृत्तसंस्थेने दिल्ली पोलिसांच्या उच्चपदस्थ सूत्रांचा हवाला देत म्हटले होते की, "आतापर्यंत आम्हाला ब्रिजभूषण सिंह यांना अटक करण्यासाठी पुरेसे पुरावे मिळालेले नाहीत. 15 दिवसांत कोर्टात अहवाल सादर करायचा आहे. ते आरोपपत्र किंवा अंतिम अहवालाच्या स्वरूपात असू शकते. कुस्तीपटूंचा दावा सिद्ध करण्यासाठी कोणताही आधारभूत पुरावा नाही."
तसेच, दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला पुढे सांगितले की, "प्राथमिकमध्ये दाखल केलेल्या पॉक्सोच्या कलमांतर्गत सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा आहे. यामुळे तपास अधिकारी मागणीनुसार आरोपीला अटक करू शकत नाही आणि आरोपी साक्षीदारावर प्रभाव टाकत नाही किंवा पुरावा नष्ट करत नाही." विशेष म्हणजे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेवर कुस्तीपटू ठाम आहेत.
मंगळवारी साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटू त्यांच्या पदकांचे विसर्जन करण्यासाठी त्यांच्या समर्थकांसह हरिद्वार येथे पोहोचले होते. मात्र, शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी कुस्तीपटूंना वाटेत अडवून समज दिली. यानंतर कुस्तीपटूंनी आपले पदक नरेश टिकैत यांच्याकडे सुपूर्द केले. या सोबतच कुस्तीपटूंनी याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
याशिवाय, यापूर्वी 29 मे रोजी कुस्तीपटू संसद भवनाच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान दिल्ली पोलिसांनी सर्व कुस्तीपटूंना ताब्यात घेतले होते. तसेच, त्याचवेळी कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर आंदोलनासाठी लावलेले तंबू पोलिसांनी हटवले होते.