दिल्लीत नामांतरावरुन राजकारण तापलं, नजफगडसह 'या' भागांची नावं बदलण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:50 IST2025-02-27T17:50:18+5:302025-02-27T17:50:44+5:30

नजफगडच्या आमदार नीलम पहलवान यांनी शून्य प्रहरात आपल्या मतदारसंघाचे नाव बदलण्याची शिफारस केली.

Delhi Politics Najafgarh Mohammadpur Mustafabad BJP Demand change of name | दिल्लीत नामांतरावरुन राजकारण तापलं, नजफगडसह 'या' भागांची नावं बदलण्याची मागणी

दिल्लीत नामांतरावरुन राजकारण तापलं, नजफगडसह 'या' भागांची नावं बदलण्याची मागणी

नवी दिल्ली : दिल्लीत भाजपची सत्ता आली आहे. यानंतर आता शहरांच्या नामांतराबाबत राजकारणही सुरू झाले आहे. आज दिल्ली विधानसभेत आमदारांनी काही भागांची नावे बदलण्याची शिफारस केली आहे. नजफगडच्या आमदार नीलम पहलवान यांनी शून्य प्रहरात आपल्या मतदारसंघाचे नाव बदलण्याची शिफारस केली. याबाबत एका टीव्ही चॅनलसोबत नीलम पहलवान यांनी संवाद साधला.

यावेळी, मुघल काळात नजफ खानला या भागाचा सुभेदार बनवण्यात आले होते. तेव्हापासून या भागाचे नाव नजफगड पडले. १८५७ च्या लढाईत जाटांनी अभूतपूर्व योगदान दिले. १८५७ च्या उठावात राजा नागरसिंहजी यांनी केवळ इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला नाही, तर ब्रिटीश सरकार उलथवून टाकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही आमच्या विधानसभा मतदारसंघाचे नाव बदलून नाहरगड करण्याची मागणी करत आहोत, असे नीलम पहलवान यांनी सांगितले.

मोहम्मदपूरचे माधोपुरम व्हावे!
दिल्लीचे आरके पुरमचे आमदार अनिल शर्मा यांनी आपल्या भागातील मोहम्मदपूरचे नाव बदलून माधोपुरम करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, केवळ निवडणुकाच नाही तर तेथील लोकही बऱ्याच काळापासून ही मागणी करत आहेत. तसेच, दिल्ली महानगरपालिकेने या भागाचे नाव बदलण्याची शिफारस आधीच केली आहे, असेही अनिल शर्मा यांनी सांगितले.

मुस्तफाबादचे नाव बदलून शिवविहार करावे!
विधानसभेचे उपाध्यक्ष आणि मुस्तफाबादचे आमदार मोहन सिंग बिष्ट यांनी एका चॅनलशी संवाद साधताना सांगितले की, येत्या काळात मुस्तफाबादचे नाव बदलून शिवविहार केले जाईल, हे निश्चित आहे. नामांतर करणे, हे निवडणुकीतील वचन होते आणि आम्ही जनतेला दिलेले हे वचन पूर्ण करू. तसेच, मुस्तफाबादमध्ये मुस्तफा नावाचा एक परिसर आहे, तो परिसर मुस्तफाच राहील, परंतु संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचे नाव शिवविहार असे बदलले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या आधाही नामांतराची मागणी
दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रवेश वर्मा म्हणाले की, नीलम पहलवान यांनी नाव बदलण्याबाबत आपल्याशी यापूर्वी चर्चा केली होती. हा त्यांच्या जुन्या लोकसभा मतदारसंघाचा परिसर आहे, ज्याचे नाव बदलण्याबद्दल त्यांनी भाष्य केले होते. दरम्यान, प्रवेश वर्मा यांनी नीलम पहेलवान यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. 

Web Title: Delhi Politics Najafgarh Mohammadpur Mustafabad BJP Demand change of name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.