दिल्लीत प्रदुषणामुळे पक्षी कोसळताहेत जमिनीवर; राजधानीचे झाले गॅस चेंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 01:16 AM2019-10-31T01:16:16+5:302019-10-31T01:16:55+5:30
कृषी कचरा व फटाक्यांच्या धुरामुळे हवा झाली विषारी
टेकचंद सोनवणे
नवी दिल्ली : वाढत्या प्रदूषणाच्या तडाख्यातून दिल्लीतील पक्षीदेखील सुटले नाहीत. विषारी हवेमुळे श्वसनास अडथळा आल्याने तीन दिवसांत शेकडो पक्षी उडता-उडता जमिनीवर कोसळले. चांदनी चौकातील पक्ष्यांच्या रूग्णालयात शंभरावर कबुतरांवर उपचार सुरू आहेत. रस्त्याच्या कडेला, झाडाखाली निपचित पडलेल्या पक्ष्यांना सहृदयी लोक रुग्णालयात आणल्याने त्यांचा जीव वाचला.
पराली (कृषी कचरा) व फटाक्यांच्या धुरामुळे दिल्लीची हवा विषारी झाली. वायू गुणवत्ता निर्देशांक बुधवारी ७०० च्या वर गेला. तज्ज्ञांच्या मते पक्षांना फटाक्यांचा धुराचा त्रास होतो. प्राणवायू कमी पडत असल्याने एकाचवेळी श्वास घेणे व उडण्याची प्रक्रिया गतिमान होते. पक्षी दमतात व जमिनीवर कोसळतात, अशी माहिती चॅरिटी बर्ड हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने दिली.
अनेक पक्ष्यांचे अयवय निकामी होतात. शरीरातील पाणी कमी झाल्याने पक्ष्यांचा मृत्यू होतो, असे डॉ. हॅरी यांनी सांगितले. तीन दिवसांत या रूग्णालयात १४५ पक्ष्यांवर उपचार करण्यात आले. फटाक्यांमुळे दोन पक्षी भाजले. त्यांना पुन्हा आकाशात कधीच भरारी घेता येणार नाही.
उपचारांनाही मर्यादा
तीन दिवसांत मी ३०-३५ पक्ष्यांवर उपचार केले. धुक्यामुळे पक्ष्यांना दिसत नाही. त्यामुळे ते इमारतींनाही धडकतात. जखमी होतात. पक्ष्यांचे फुफ्फुस नाजूक असते. त्यामुळे त्यांना औषध देताना विचार करावा लागतो. इंजेक्ट करण्यास मर्यादा असतात. शरीरातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी, रक्त शुद्ध करणारी औषधे त्यामुळे दिली जातात. - डॉ. हॅरी, चॅरिटी बर्ड हॉस्पिटल, चांदनी चौक
हवेत मिसळले विष : दिवाळीनंतर दिल्लीच्या हवेत विष मिसळले आहे. लहान मुले, वृद्धांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. डोळ्यांची जळजळ, अंगास खाज सुटण्यासारखी लक्षणे जाणवू लागली आहेत. सकाळी फिरायला न जाण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. प्रदूषण कमी न झाल्यास 'आरोग्य आणीबाणी' जाहीर होण्याची शक्यता आहे. शाळांना दिवाळीची सुट्टी वाढवण्यावरही विचार सुरू आहे.