फक्त दिल्लीच नाही, तर पाकिस्तानपासून बंगालपर्यंत प्रदूषण, NASA ने दाखवला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 06:56 PM2023-11-08T18:56:18+5:302023-11-08T18:57:10+5:30
दिल्ली-एनसीआरसह आजुबाजूच्या परिसरात भीषण प्रदूषण झाले आहे.
Pollution in India: उत्तर भारतीयांना सध्या श्वास घेणेही अवघड झाले आहे. राजधानी दिल्लीसह एनसीआर आणि आजुबाजूचा परिसर गॅस चेंबर बनला आहे. पंजाबच्या हजारो शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे शेतात जाळलेल्या गवतामुळे, वाहनांचे प्रदूषण आणि कारखान्यांमधून निघणाऱ्या घातक धुरामूळे सर्वत्र भीषण प्रदूषम झाले आहे. दिल्लीसह संपूर्ण एनसीआरमधील पुढील काही दिवसांसाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, नासाने सॅटेलाईट इमेज प्रसिद्ध करून हे प्रदूषण केवळ उत्तर भारतातच नाही, तर बंगालच्या उपसागरापर्यंत पसरल्याची माहिती दिली आहे.
NASA चा डेटा दर्शवतो की, 29 ऑक्टोबरपासून शेतातील वाळलेले गवत जाळण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. ऑक्टोबर 29 मध्ये 1,068 शेतातील आगीच्या घटनांसह 740 टक्के वाढ झाली. चालू हंगामातील एका दिवसातील हा उच्चांक आहे. सुप्रीम कोर्टाने दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान सरकारांना शेतातील आग रोखण्यासाठी केंद्राशी त्वरित चर्चा करण्यास सांगितले आहे.
नासाच्या सॅटेलाइट इमेज खूप भीषण आहेत. विषारी धूर पाकिस्तानमधून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला दिसतोय. या भागात मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. नासाने 1 आणि 8 नोव्हेंबरचे फोटो दाखवले आहेत, ज्यात प्रदूषणातील फरक स्पष्टपणे दिसत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर, दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) येत्या काही दिवसांत आणखी गंभीर श्रेणीत येईल.
प्रदूषणापासून मुक्ती कधी मिळणार?
येत्या काही दिवसांत उत्तर भारतातील लोकांना प्रदूषणापासून दिलासा मिळू शकतो. दिल्ली NCR मध्ये खूप हलका पाऊस किंवा रिमझिम पाऊस पडू शकतो. याशिवाय, वाऱ्याच्या दिशेवरही खूप काही अवलंबून आहे. येत्या काही दिवसांत वाऱ्याची दिशा बदलू शकते, ज्यामुळे उत्तर भारतीयांना या प्रदूषणापासून सुटका होईल.